खेळरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार’ असे पुनर्नामकरण!
ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणाऱ्या देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेळरत्न पुरस्काराचे पुनर्नामकरण करण्यात आले आहे. भारतीय हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ आता हा पुरस्कार ‘मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जाणार आहे. सद्या सुरु असलेल्या टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये भारतीय व महिला हॉकी संघाने प्रशंसनीय कामगिरी केल्याच्या निमित्ताने हा बदल करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
खेळरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार’ असे पुनर्नामकरण केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी म्हणाले, की खेळरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून ठेवण्यात यावे अशा कित्येक देशवासीयांच्या मागण्या त्यांच्याकडे होत होत्या.
वाचा । खेळरत्न पुरस्कारासाठी अश्विन व मिथाली राजच्या नावांची शिफारस
“संबंधित लोकांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेळरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ध्यानचंद यांच्या नावे दिला जाणे अतिशय साजेसे आहे”, असे पंतप्रधानांनी ट्विटले आहे. अतिशय प्रतिष्ठित अशा या पुरस्काराची राशी एकूण २५ लाख रुपये इतकी आहे.
टोकियो ऑलम्पिकमधील भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांच्या विलक्षण कामगिरीमुळे आपल्या देशात नवकल्पना संचारली आहे. लोकांमध्ये नव्याने हॉकीसंबंधी आवड निर्माण झाली आहे आणि येणाऱ्या काळासाठी हे अतिशय चांगले सूचक आहे, असेही ते म्हणाले.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in