‘लोकशाहीरां’च्या साहित्यातले ‘लोकमान्य’!
लोकमान्य टिळकांनी गीतेचा सार असणारा ‘गीतारहस्य’ नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला, तर अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’सह अनेक दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्या. अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या ‘गण’ या काव्यप्रकारात तीन कवितांमधून लोकमान्य टिळकांबद्दल त्यांचे महत्त्व सांगणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहेत.
ब्रेनविशेष | प्रसाद पाचपांडे
आजचा दिवस, १ ऑगस्ट २०२०. महाराष्ट्राच्या साहित्यासाठी आणि इतिहासासाठी आजचा दिवस खूप वेगळा आहे. आज लोकमान्य टिळक यांची १०० वा स्मृतीदिन, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती. एक पत्रकार, जहाल लेखक, गणितज्ञ, प्रखर राष्ट्रवादी, इंग्रजांनी ज्यांचा ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असा उल्लेख केला, असे लोकमान्य. तर दुसरे साहित्यरत्न लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलनात ज्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले, असे अण्णा भाऊ साठे. आज एकाची जयंती, तर एकाची पुण्यतिथी.
लोकमान्य टिळकांनी गीतेचा सार असणारा ‘गीतारहस्य’ नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला, तर अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’सह अनेक दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या ३ कवितांमध्ये लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केला आहे.
१) गण हा काव्यप्रकार
२) महाराष्ट्राची परंपरा
३) मुंबईचा गिरणी कामगार
अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या ‘गण’ या काव्यप्रकारात लोकमान्य टिळकांबद्दल त्यांचं महत्व सांगणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहेत. त्या या निमित्ताने बघूया.
“प्रथम मायभूचा चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनी गातो कवणा ||धृ ||
स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना
लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना
कठीण काळी राष्ट्रनौकाना
मार्ग दाखविला तयांना
देशा दिली ज्यांनी प्रेरणा ||१||”
वरील गणात अण्णा भाऊ साठे सर्वात पहिले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती महाराज यांचं स्मरण करून “प्रथम मायभूचा चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवणा” म्हणजेच सर्वात पहिले मायभूमी आणि छत्रपती शिवराय यांना वंदन करतात. आणि त्यांना स्मरण करून पुढील गण सादर करतात. त्यापुढील कडव्यात ते लोकमान्यांबद्दल लिहितात “स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना, लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना”. अर्थात, “मी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अशा व्यक्तीला स्मरण करतो ज्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करून सर्वसामान्य लोकांना जागे केले, जेणेकरून येथील लोक हे इंग्रजांविरोधात स्वराज्यासाठी एकत्र येतील.
पुढे ते लिहितात, “कठीण काळी राष्ट्रनौकाना, मार्ग दाखविला तयांना”, अर्थात “या देशात जेव्हा इंग्रजांविरोधात कठीण काळ होता, दडपशाही होती, तेव्हा येथील राष्ट्रनौकांना म्हणजेच सर्वसामान्य लोकांना ‘स्वराज्य’ हा मार्ग लोकमान्य टिळक यांनी दाखविला आणि देशाला इंग्रजांविरोधात लढण्यासाठी प्रेरणा दिली. अशा लोकमान्य टिळक यांना मी वंदन करतो.” हे आहेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे लोकमान्य टिळक यांचा बद्दलचे गौरवोद्गार.
आज आपण सर्व महापुरुषांची विभागणी करतो. अशावेळी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ही गण कविता बराच काही सांगून जाते. जिथे आज जात पाहून महापुरुषांची जयंती साजरी केली जाते, अशा परिस्थितीत आजच्या महाराष्ट्राला आज या दोन्ही महापुरुषांची अत्यंत गरज आहे.
दुसरी कविता आहे ‘मुंबईचा गिरणीकामगार’. तीत त्यांनी लोकमान्य टिळक यांना अटक केल्यावर जी स्थिती निर्माण झाली, त्याविषयी अण्णा भाऊ साठे यांनी वर्णन केले आहे.
“सन एकोणीसशे आठ साली | इंग्रजांनी भली |
अटक बघा केली | टिळकांना कारागृहीं नेले
मुंबईचा कामगार खवळे | निषेध संपाचे वादळ उठले |
हिंदच्या मुक्तीचे भले ||”
यामध्ये १९०८ साली लोकमान्य टिळक यांना अटक केल्यावर मुंबईचे गिरणी कामगार कसे खवळले आणि पुढे संप पुकारून त्यांनी केलेला निषेध व्यक्त केला हे सांगितले आहे.
अण्णाभाऊ तिसऱ्या एका पोवाड्यात लोकमान्य टिळकांचा उल्लेख करतात. ‘महाराष्ट्राची परंपरा’ या पोवाड्यात ते उल्लेख करताना लिहितात,
“टिळकांनी घालून साद सिंह उठवला
उन्मत्त गोऱ्या गजाला, निर्भय इशारा दिला ||
पळ काळे कर लवलाही केसरी आला ||”
यात अण्णाभाऊ साठे टिळकांना सिंहाची उपाधी देतात आणि त्यांनी इंग्रजांना न घाबरता ‘केसरी’मधून जे लेख लिहिले त्याविषयीचा उल्लेख अण्णाभाऊ यांनी केला आहे.
अण्णाभाऊ यांचा काळ वेगळा, दृष्टिकोन वेगळा. तरीही ते लोकमान्य टिळकांचा आपल्या कवितांमध्ये अशाप्रकारे उदात्त उल्लेख केला आहे. माणूस कितीही मोठा झाला, तरी इतर व्यक्तींबद्दल असलेला आदरभावच अण्णाभाऊ साठे यांच्या वरील कवितांमध्ये दिसून येतो. आज यांच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती, तर स्वातंत्र्यसंग्रामतील अग्रणी लोकमान्य टिळक यांची १०० वी पुण्यतिथी. त्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांनी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल लिहिलेल्या या ओळींसह दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन !
लेख : प्रसाद पाचपांडे, जि. अमरावती
ट्विटर : @prasadpachpandhe
ई-मेल : prasadpachpande12@gmail.com
(प्रस्तुत लेखात प्रकाशित विचार हे पूर्णतः लेखकाचे असून, मराठी ब्रेन व संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)
Subscribe on Telegram @marathibrainin
विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन