वातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही!

ब्रेनवृत्त | मुंबई

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेअंतर्गत नवीन बारा डबा वातानुकूलित लोकल किंवा अर्धवातानुकूलित लोकल लवकर सुरू होणार की नाही याबद्दल परत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २३८ वातानुकूलित लोकल चालवण्यासंदर्भात अद्यापही स्पष्टता नसल्याने या प्रकल्पांचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्याच्या सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (MVRC : Mumbai Rail Vikas Corporation) केल्या आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या मध्य रेल्वेच्या ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर एक, तर पश्चिम रेल्वेवर दोन वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाद्वारे सामान्य लोकलच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचे आकारले जाणारे भाडे अतिजास्त असल्याने या सेवेस प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे याला पर्याय म्हणून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचा विचारही रेल्वेकडून केला जात आहे, पण यावरही अद्याप एकमत झालेले नाही. परिणामी ‘एमयूटीपी-३’ व ‘एमयूटीपी ३ए’मध्ये येणाऱ्या वातानुकूलित लोकलचे कामही रखडले आहे.

वाचा | शिक्षक, शासकीय व बस कर्मचारी यांनाही लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी !

● एकूण २३८ वातानुकूलित लोकलचा प्रस्ताव

‘एमयूटीपी-३’ला डिसेंबर २०१६ मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली. याअंतर्गत ४७ वातानुकूलित लोकलचाही समावेश असून, या लोकल गाड्यांसाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र निविदा प्रक्रियेत झालेल्या घोळामुळे या लोकल मुंबईत दाखल होण्यास विलंबच होणार आहे. सोबतच, एमयूटीपी-३ ए प्रकल्पालाही मंजुरी मिळाली असून, यामध्ये १९१ वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, सध्या मुंबईत धावत असलेल्या या वातानुकूलित लोकल गाड्यांना नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नव्याने येणाऱ्या वातानुकूलित लोकलचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्यास मंडळाला सांगितले आहे.

मुंबईची जीवनवाहिनी होणार १५ डब्यांची !

सध्या अर्धवातानुकूलित लोकलचा पर्याय समोर असला तरीही त्यात तांत्रिक समस्या येण्याची शक्यता असल्याने त्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी बारा डबा वातानुकूलित लोकलमध्ये सामान्य लोकलप्रमाणे प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी ठेवून त्यानुसार भाडे आकारणीचाही विचार मंत्रालयाकडून होत असल्याची माहिती आहे.

वाचा | उपनगरीय रेल्वेच्या सुमारे ४५% महिला प्रवासी असुरक्षित

दरम्यान, मुंबई मिररने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात लोकल सेवा प्रकल्पाच्या समभागधारकांशी झालेल्या बैठकीत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव म्हणाले होते की, वातानुकूलित लोकल सेवेला काहींचा विरोध आहे. तसेच पश्चिम रेल्वेसुद्धा पूर्णतः वातानुकूलित रेल्वे सेवेविषयी संशयित भूमिका घेऊन आहे. “उपनगरीय विभागासाठी पूर्ण वातानुकूलित सेवेेऐवजी अर्धवातानुकूलित लोकल सेेवा अधिक योग्य राहील”, असे पश्चिम रेल्वेने यादव यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: