निलेश राणेंना सारंग पुणेकर यांचे चोख प्रत्युत्तर
ब्रेनवृत्त, २० मे
‘जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल, इतिहास माहीत नसेल, तर मी सांगते. पण, आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका’, अशा शब्दात सारंग पुणेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना ठणकावलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरु आहे. या युद्धात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनीदेखील उडी घेतली. त्यामुळे चिडलेल्या निलेश राणे यांनी अगदी खालच्या पातळीत तनपुरे यांच्यावर टीका केल्याने सारंग पुणेकर यांनी निलेश राणेंचा ट्विटरवरून खरपूस समाचार घेतला.
“कोणतरी हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले… समोर आले की पिवळी होते साल्यांची. जागा सांग तनपूरे, येतो मी”, अशा शब्दांत निलेश राणे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका केली. राणेंच्या या टिकेला तृतीयपंथी सारंग पुणेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल, इतिहास माहीत नसेल, तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये,तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल”, असे म्हणत सारंग यांनी निलेश राणेंना थेट इशाराच दिला.
जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल@meNeeleshNRane @doke_snehal pic.twitter.com/oQCe7KsZLH
— Sarang Punekar (@sarang_punekar) May 19, 2020
खरंतर, निलेश राणे शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा राणे-पवार वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे निलेश राणे आणि रोहित पवार यांच्या वादाला आता वेगळे वळण लागले असून, राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर उद्योग वाचविण्याची मागणी केली होती. त्यावर निलेश राणे यांनी कोणत्या साखर कारखानदाराकडे किती संपत्ती आहे, याचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी ट्विटद्वारे केली होती.
राणेंच्या या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदविताना म्हटले की, ‘पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांच्या दुरावस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठविले.’ यावर ‘मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्यांसारखी हालत होईल तुझी’, असे म्हणत निलेश राणे यांनी पुन्हा रोहित पवार यांच्यावर टीका केली.