शिक्षक, शासकीय व बस कर्मचारी यांनाही लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी !

ब्रेनवृत्त, मुंबई

कोव्हिड-१९‘ पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्य व पश्चिम लोकल रेल्वेची सेवा पालिकेच्या शिक्षकांसाठी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीही उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेने काल दिले आहे. तसेच, खासगी व शासकीय रुग्णालयात काम करणारे प्रयोगशाळा कर्मचारी, एसटी कर्मचारी यांनाही या सेवेचा वापर करता येणार आहे.

मुंबई महानगरची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय लोकल सेवा मर्यादित प्रमाणात नुकतीच सुरू करण्यात आली आहे. १५ जूनपासून मध्य व पश्चिम लोकल रेल्वे सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. पण ही सेवा पालिकेतील शिक्षकवर्ग, इतर शासकीय कर्मचारी यांनाही उपलब्ध आहे की नाही, याविषयी स्पष्टता नव्हती. मात्र, काल पश्चिम रेल्वेने हा संभ्रम दूर करत ही रेल्वे सेवा पालिकेच्या शिक्षकांसाठी व जिल्हाधिकारी कार्यलयातील कर्मचारी, तसेच खासगी व शासकीय रुग्णालयात काम करणारे प्रयोगशाळा कर्मचारी, एसटी कर्मचारी यांच्यासाठीही उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

संग्रहित छायाचित्र

दरम्यान, मध्य रेल्वेच्या बाबतीत याविषयी अद्याप संभ्रमच आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या निर्देशानुसारच मध्य रेल्वेची लोकल सेवा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना उपलब्ध असून, इतर प्रवाशांविषयी पश्चिम रेल्वेने काय निर्णय घेतला ते माहीत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : उपनगरीय रेल्वेच्या सुमारे ४५% महिला प्रवासी असुरक्षित

पश्चिम रेल्वेने अद्ययावत आदेश काढला असून, यानुसार आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, पालिका शाळेतील शिक्षक आणि पालिकेचे कंत्राटी कर्मचारी यांनाही लोकल रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध प्रयोगशाळांतील कर्मचाऱ्यांनाही या रेल्वेने प्रवास करणे शक्य झाले आहे.

दुसरीकडे, उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याआधी टाळेबंदी काळात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी जवळपास ६०० विशेष बस चालवल्या जात होत्या. मात्र, पश्चिम आणि मध्य रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाल्याने आता मोफत बस प्रवाससेवा बंद करण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने घेतला आहे. येत्या आठवड्यात टप्प्याटप्याने ही सेवा बंद केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. यामुळे, आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टने प्रवास करताना तिकीटाचे पैसे द्यावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: