‘स्पेसएक्स फाल्कन ९’ ठरले नव्या इतिहासाचे साक्षी !
रायटर्स, कॅनावरेल
अमेरिकी खासगी क्षेपणास्त्र कंपनी ‘स्पेसएक्स’ने (SpaceX) फ्लोरिडाच्या केप कॅनावरेल येथील ‘जॉन एफ. केनेडी अंतराळ केंद्रातून अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ संस्थे’च्या (NASA) दोन अंतराळवीरांना आज अंतराळात पाठवले. या भरारीमुळे ‘नासा’ने गेल्या ९ वर्षांत पहिल्यांदाच स्वतःच्या जमिनीवरून अंतराळात माणसे पाठवण्याचा विक्रम केला आहे.
नासाने ‘स्पेसएक्स’ या खासगी कंपनीच्या मदतीने आज जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून ‘नासा स्पेसएक्स डेमो-२’ अभियानाला सुरुवात केली. ‘स्पेसएक्स फाल्कन ९’ या क्षेपणास्त्राने खास ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक’कडे (ISS : International Space Station) अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या ‘क्रिव्ह ड्रॅगन’च्या साहाय्याने नासाच्या डग हर्ले (Doug Hurley) आणि and बॉब बेहनकें (Bob Behnken) या अंतराळवीरांना घेऊन अंतराळात झेप घेतली.
हेही वाचा : चीन तयार करतोय ‘कृत्रिम चंद्र’ !
याआधी २०११ मध्ये नासाने याच ठिकाणावरून तिची अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याची मोहीम डग हर्ले यांच्याच नेतृत्वाखाली फत्ते केली होती. मात्र, त्यानंतर अमेरिकी अंतराळवीरांना रशियाच्या सोयुझ अंतराळयानाद्वारेच अंतराळात जावे लागले आहे. त्यानंतर, आज तब्बल ९ वर्षांनंतर खासगी कंपनीच्या मदतीने नासाने स्वतःच्या जमिनीवरून अवकाशात झेप घेतली आहे.
Falcon 9 lifts off from historic Launch Complex 39A and sends Crew Dragon to orbit on its first flight with @NASA astronauts to the @space_station pic.twitter.com/UOoaKiQaFk
— SpaceX (@SpaceX) May 31, 2020
नासाचे संचालक जीम ब्राईडेन्स्टीन यांनी म्हटले, “अमेरिकेने ९ वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत. मला नासावर आणि टीमवर गर्व आहे.” हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वीरित्या गेले असून कॅप्सूल यशस्वीरित्या उघडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळातच जाहीर केले.
याआधी, ही मोहीम बुधवारीच पार पडण्याचे नियोजित होते, मात्र वातावरणाची परिस्थिती अनुकूल नसल्याचे उड्डाणाच्या मोहिमेच्या १७ मिनिटांआधी ही मोहीम स्थगित करण्यात आली होती. आजही उड्डाणाच्या काही वेळेआधी हवामानात प्रतिकूल चिन्ह निर्माण झाले होते, मात्र काही वेळांतर वातावरण अनुकूल जाणवू लागल्याने अखेर मोहीम पार पडली.
◆◆◆