‘सॉल्फरिनोची लढाई’ आणि ‘रेडक्रॉस’ची स्थापना

विविध राष्ट्रांमध्ये होणाऱ्या युद्ध अथवा लढाया यांमध्ये अनेक सैनिक मारले जातात. अनेकांची प्राणहानी होते, जीवित मारले जातात अथवा व्यंग्यत्व येते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लढायांमध्ये जखमी होणाऱ्या सैनिकांवर, तसेच लोकांवर उपचार करण्यासाठी जागतिक स्तरावर किंवा संघटना स्वरूपात काही विशेष उपाययोजना नव्हती, पुढाकार नव्हते. मात्र त्यानंतर, एका नोबेल विजेत्या समाजसेवकाच्या पुढाकाराने ‘रेडक्रॉस समिती’ उभी राहिली. आज  ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ व ‘रेड क्रेसेंट दिन’. यानिमित्तानेच वाचकांसाठी हे ‘ब्रेनविशेष’…

 

ब्रेनविशेष | जागतिक रेडक्रॉस दिन

जगभरातील रुग्णालये वा इस्पितळे यांच्या बाहेर आपण नेहमीच एक लाल रंगाचे चिन्ह बघत असतो. खरंतर, त्या चिन्हावरूनच आपल्याला त्या अथवा एखाद्या ठिकाणी रुग्णालय, इस्पितळ असल्याचे समजते. त्या चिन्हाला ‘रेडक्रॉस‘ म्हणतात. संपूर्ण जगभरातील रुग्णालयांची किंवा आरोग्य संस्थांची ओळख त्या चिन्हावरूनच केली  जाते. पण तुम्हाला माहित आहे का, की ह्या चिन्हाला इतके महत्त्व का म्हणून? याबद्दलच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

● रेडक्रॉस दिन म्हणजे काय?

‘रेडक्रॉस’चे जनक व ‘आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती’चे (ICRC : International Committee of the Red Cross) संस्थापक हेनरी दुनांत (Henry Dunant) यांचा जन्म 8 मे 1828 रोजी झाला. त्यांचा वाढदिवस ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ (World Red Cross Day) म्हणून  दरवर्षी ८ मे ला साजरा केला जातो. सन 1901 मध्ये हेनरी दुनांत यांना त्यांच्या मानवी सेवाकार्यासाठी ‘पहिले नोबेल शांतता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच, युद्धात जखमी झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या आपत्कालीन परिस्थितीत पीडितांना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांसाठीही ‘रेडक्रॉस दिन’ व तसेच, ‘रेड क्रेसेंट दिन’ साजरा केला जातो.

● ‘रेडक्रॉस’ची कल्पना कशी आली ?

हेनरी दुनांत हे एक स्विस उद्योजक होते. एकदा आपल्या कामानिमित ते इटलीला गेले असताना त्यांनी तिथे ‘सोल्फेरिनोची लढाई’ (The Battle of Solferino – २४ जून १८५९) पाहिली. त्या युद्धात एकाच दिवसात 40,000 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. ही परिस्थिती पाहून त्याचे हृदय पिळवटून निघाले. त्या जखमी  सैनिकांवर उपचार करण्यासाठी त्यावेळी कोणतीही वैद्यकीय साधन-सामुग्री उपलब्ध नव्हती. तरीही, त्यावेळी दुनांत यांनी स्वयंसेवकांचा एक गट तयार करून जखमींना अन्न, पाणी आणि औषध आणून  जखमींवर उपचार केले.

हेनरी दुनांत आणि रेडक्रॉस संस्था

छायाचित्र साभार : The Asian Age

या घटनेच्या तीन वर्षांनंतर दुनांत यांनी लिहिलेल्या ‘सॉल्फरिनोची आठवण‘ (A Memory of Solferino) या पुस्तकात युद्धानंतरच्या भयानक दृश्याचे वर्णन केले आहे. युद्धामध्ये आपल्या शरीराचे एखादे अंग गमावलेले सैनिक कसे  जीवाच्या आकांताने ओरडत आहेत, जखमी झालेल्या त्या लोकांना कसे मरण्यासाठी सोडून दिले जाते, हे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.  मात्र, याच पुस्तकाच्या शेवटी त्यांनी युद्धात जखमी झालेल्यांवर किंवा कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात अडकलेल्या पिडीतांना मदत करण्यासाठी कायमस्वरुपी ‘आंतरराष्ट्रीय समाज’ स्थापनेची सूचनाही त्यांनी केली. परिणामी, त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांची ही सूचना लागू करण्यात आली.

● ‘रेड क्रॉस’च्या स्थापनेचा प्रवास

हेनरी दुनांत यांच्या सुचनेनुसार, फेब्रुवारी 1863 मध्ये, ‘जिनेव्हा पब्लिक वेलफेयर सोसायटी’ने एक समिती स्थापन केली. त्या समितीत स्वित्झर्लंडमधील पाच नागरिकांचा समावेश होता. समितीच्या पाच सदस्यांमध्ये जनरल गेम हेनरी डुफर, गुस्ताव्ह मोयनिअर, लुई अप्पिया, थिओडोर मोनोइर आणि स्वतः हेनरी दुनांत. गेम हेनरी डुफर हा स्विस सैन्याचा सेनापती होता. एक वर्ष ते समितीचे अध्यक्ष आणि नंतर मानद अध्यक्ष होते. गुस्ताव्ह हे एक तरुण वकील आणि लोक कल्याण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी रेडक्रॉसच्या कामांमध्ये आपले  संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. लुई आणि थिओडोर डॉक्टर होते. या समितीला हेनरी दुनांत यांच्या सूचनांचा विचार करावा लागला.

हेही वाचा : ओझोनचा थर : पृथ्वीवरील जीवसृष्टीचा संरक्षक

ऑक्टोबर, 1863 मध्ये समितीने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. या परिषदेत 16 राष्ट्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते. यात त्यांनी अनेक महत्त्वाचे  प्रस्ताव आणि तत्त्वांच्या स्विकार केला. तसेच, या परिषदेत समितीसाठी आंतरराष्ट्रीय प्रतीकाचीही निवड करण्यात आली. त्या निमित्ताने, जगातील सर्व राष्ट्रांना युद्धात आजारी व जखमी लोकांची काळजी घेणाऱ्या स्वैच्छिक संस्था स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. या संस्था ‘राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था (नॅशनल रेडक्रॉस सोसायटी)‘ म्हणून ओळखल्या जात. तर, उर्वरित पाच सदस्यांची समिती सुरुवातीला ‘जखमी झालेल्यांसाठीची आंतरराष्ट्रीय मदत समिती’ म्हणून ओळखली जात असे. नंतर रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस’ (आईसीआरसी) असे नामकरण करण्यात आले.  या समितीचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. आयसीआरसीला जगभरातील सरकारकडून, तसेच नॅशनल रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायट्यांकडून निधी मिळतो.

हेनरी दुनांत यांनी समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आणि जगभरातील लोकांनाही स्वतःला ‘मानवतावादी सेवक’ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी प्रेरित केले. या सेवाकार्यासाठी त्यांनी तयार केलेल्या सोसायटीचे नाव शेवटी ‘रेडक्रॉस’ (Red Cross) ठेवले गेले. सध्या रेडक्रॉस सोसायटी जगातील 186  देशांमध्ये कार्यरत आहे. सन 1901 मध्ये दुनांत यांना त्यांच्या मानवी सेवाकार्यासाठी पहिला नोबेल शांतता पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला. आज ८ मे, म्हणजेच ‘जागतिक रेडक्रॉस दिन‘ व ‘रेड क्रेसेंट डे’.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: