भारत-चीन सीमावाद ; नेमकं काय काय घडतंय ?
गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमध्ये ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’वर (Line of Actual Control) तणावाचे वातावरण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये शांततेत चर्चा सुरु होती. मात्र सोमवारी (ता. १६) रात्री अचानक भारत आणि चीनच्या सैन्यात चकमकी सुरु झाल्या. यात भारतातील २० सैनिकांसह एक कर्नल पदावरील अधिकारी हुतात्मा झाले. त्यानंतर, पुन्हा एकदा भारत आणि चीन मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत नेमकं काय काय घडलं, याविषयीचा हा संपूर्ण आढावा.
१८ जून २०२०
ब्रेनविश्लेषण | अनुराधा धावडे
● ही चकमक कोणत्या भागात आणि का झाली ?
सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा‘ व तसेच, गलवान आणि श्योक नदी संगमाच्या भागात हा संघर्ष झाला. गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याने माघार घ्यावी, यासाठी ‘पेट्रोलिंग पॉईंट १४’वर दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. हा भाग नियंत्रण रेषेजवळ आहे. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ‘बफर झोन’ निर्माण करण्याचं ठरलं होतं. म्हणजेच नियंत्रण रेषा तसेच गलवान आणि श्योक नदीच्या जंक्शनचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय झाला होता.
यानुसार, समोरासमोरचा संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैनिक नदीच्या पश्चिमेला, तर चिनी सैनिक पूर्वेला एलएसीजवळ जाणार होते. या ठिकाणी १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी आणि त्यांची तुकडी तैनात होती. दरम्यान, चीनी सैनिकांनी गलवान नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील बफर झोनमध्येच नवीन चौकी उभारण्याचं काम सुरु केलं. त्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली. बिहार रेजिमेंटच्या तुकडीने ही चौकी हटवण्यासाठी चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडे आग्रह धरताच तणाव वाढला आणि संघर्षाची स्थिती उदभवली.
● संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोप
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने, सीमेवरील चकमक भारतीय सैन्याने सुरु केली असून, त्यासाठी भारतीय सैन्य चीनच्या हद्दीत घुसले, असा दावा केला आहे. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय सैनिकांनी दोनवेळा सीमा ओलांडून चिनी सैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांची ही कृती दोन्ही देशांमध्ये झालेल्या शांततेविरोधात आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारिरीक संघर्ष झाला. “भारताने आपल्या जवानांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून, त्यांच्या या कृतीमुळे सीमा प्रश्न आणखी जटील होऊ शकतो”, असेही चीनने म्हटले आहे.
मात्र, चीनच्या या सर्व आरोपांना फोल ठरवत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “चिनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषेवर सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत होते. १५ जूनच्या रात्री चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचे नुकसान झालं आहे, जे टाळता आलं असतं. चीनकडून ६ जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसंच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचं उल्लंघन करण्यात आलं.”
हेही वाचा : सीमावादातील मध्यस्थिंनी ताण वाढविणारी कृती टाळावी : संयुक्त राष्ट्र
● पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
पूर्व लडाखच्या सीमेवर एकूणच युद्धजन्य परिस्थिती असून देशाच्या सीमेवर नेमके काय सुरु आहे? त्याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांसह देशभरातून केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
● “आम्हाला डिवचलं तर…” भारताचा चीनला इशारा
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला “आम्ही देखील जसाश तसं उत्तर देण्यास सक्षम आहोत”, अशा शब्दांत चीनला ठणकावलं आहे. “भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण डिवचलं तर वेळ आल्यावर भारत उत्तर देण्यात सक्षम आहे”, असा इशाराही नरेंद्र मोदी यांनी दिला.
तसेच “आम्ही नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने काम केलं आहे. अनेकदा आमच्यात मतभेदही झाले आहेत, पण मतभेदाचे वादात रूपांतर होऊ नयेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. आम्ही कधीच कोणाला डिवचत नाही. पण आपल्या देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्वासोबत आम्ही तडजोड करत नाही. जेव्हा कधी वेळ आली आहे, आम्ही देशाची देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे”, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
● केंद्राकडून लष्कराला विशेषाधिकार
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्यांचा सामना करण्यासाठी केंद्रशासनाने भारतीय लष्कराला विशेषाधिकार दिले आहेत. चिनी सैन्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी चकमक झाली आहे, तिथे योग्य वाटेल ती कारवाई करा, असे सांगत भारतीय लष्कराला केंद्रशासनाने हात केले आहेत. दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरु असून, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले एस. जयशंकर यांच्याशी फोनवरुन बातचीत केली आहे.
हेही वाचा : भारताने टाकलेल्या बहिष्काराचा चीनवर परिणाम होतोय !
● संघर्षानंतर चीनची भूमिका
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीनने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. सीमेवर भारताबरोबर आम्हाला आणखी संघर्ष नकोय, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी गलवान खोऱ्यातील चकमकीसाठी चीनला जबाबदार धरु नका. सीमेवरील परिस्थिती आता स्थिर आणि नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. तसेच, “सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारतासह चीनच्या बाजूलाही मोठी जिवीतहानी झाली. त्यांचे ३५ हून अधिक सैनिक मारले गेले. सीमेवर निर्माण झालेली परिस्थिती दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करताहेत”, असे चीनने म्हटले आहे.
● परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर याचं चीनला प्रत्युत्तर
गलवान खोऱ्यामध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आज दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. यावेळी नेहमीप्रमाणे चीनने या संघर्षासाठी भारतीय लष्कराला जबाबदार धरत या संघर्षाला कारणीभूत असणाऱ्या सैनिकांना भारताने शिक्षा द्यावी, अशी मागणी वँग यी यांनी एस. जयशंकर यांच्याकडे केली. त्यावर जयशंकर यांनी “गलवाण खोऱ्यामध्ये जे घडलं, ते सर्व पूर्वनियोजित होतं, तुम्ही हे ठरवून केलं”, असं मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : चीन भारताशी असलेले मतभेद वादात बदलणार नाही
● अखेर देशवासीयांच्या मागणीनंतर लष्कराकडून हुतात्मा जवानांची नावे जाहीर
कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (हैदराबाद), नायक सुभेदार नुदुरम सोरेन(मयूरभंज), नायक सुभेदार मंदीपसिंह (पटियाला), नायक सुभेदार सतनाम सिंह (गुरूदासपूर), हवालदार के. पालानी (मदुराई), हवालदार सुनील कुमार (पटणा), हवालदार बिपुल राय (मेरठ शहर), नायक दीपक कुमार (रीवा), शिपाई राजेश ओरांग (बीरभूम), शिपाई कुंदन कुमार ओझा (साहेबगंज), शिपाई गणेश राम (कांकेर), शिपाई चंद्रकांता प्रधान (कंधमाल), शिपाई अंकुश (हमीरपूर), शिपाई गुरबिंदर (संगरूर), शिपाई गुरतेज सिंह (मनसा), शिपाई चंदन कुमार (भोजपूर), शिपाई कुंदन कुमार (सहरसा), शिपाई अमन कुमार (समस्तीपूर), शिपाई जय किशोर सिंह (वैशाली), शिपाई गणेश हंसदा (पूर्व सिंहभूम).