केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

वृत्तसंस्था

बंगळूर, १२ नोव्हेंबर

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांचे प्रदीर्घ आजारामुळे काल रात्री उशिरा बंगळूर येथे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून बरी नव्हती. त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री उशिरा बंगळूर इथे निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मावळली. ५९ वर्षाचे अनंत कुमार कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभावी नेते होते. यानिमित्ताने कर्नाटकमध्ये तीन दिवसांचा दुखवटा आणि आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अनंत कुमार केंद्रात दोन खात्यांचे कामकाज पाहत होते. ते मे २०१४ पासून रसायन आणि खते मंत्रालय सांभाळत होते, तर २०१६ पासून ते संसदीय कामकाज मंत्री म्हणूनही कार्यरत होते. दक्षिण बंगळूर मतदारसंघाचे ते १९९६ पासून लोकसभेत प्रतिनिधित्व करीत होते.

अनंत कुमार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक राजकीय नेत्यांनी व विविध क्षेत्रातील लोकांनी शोक व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ‘अनंत कुमार हे भाजपचे मौल्यवान व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक पदभार उत्तमपणे सांभाळले आहेत.’

अनंत कुमार यांचे निधन झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले असल्याचे व त्यांच्या घरच्यांसोबत या शोकात सहभागी असल्याचे , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटमधून म्हटले आहे.

 

● अनंत कुमार यांच्याबद्दल:

१. अनंत कुमार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी बंगळूर येथे झाला.

२. के. एस. कला महाविद्यालय, हुबळी इथे त्यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जे. एस. एस. महाविद्यालयातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले.

३. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी तेजस्विनी आणि ऐश्वर्या व विजेता ह्या दोन मुली, असा परिवार त्यांच्यामागे आहे.

४. मोदी मंत्रिमंडळात ते केंद्रीय रसायन आणि खते मंत्री व सांसदीय कामकाज मंत्री म्हणून पदभार संभाळून होते.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: