‘डेटा’मय समाज माध्यमे आणि ‘सोशल इंजिनिअरिंग’

      सोशल मिडियावर लोकांनी आपले विचार मांडणे अपेक्षित असते. पण लोक इथे आपापली मते घेऊन येतात. दुसऱ्यांच्या मतांशी त्यांना घासून, प्रसंगी खणाखणी करून त्या मतांना धार लावतात. मग मोठ्या आत्मविश्वासाने मांडतात आपली तीच पक्की झालेली मते! वर्तमान सोशल जगात ‘विचार’ ही हळूहळू दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे.
      जागतिकीकरणानंतर ‘ज्ञान’ हे ‘पॉवर फिनॉमेनन’ बनलं होतं, पण आज माहिती-तंत्रज्ञान हे ‘पॉवर फिनॉमेनन’ झालं आहे, विशेषत: गेल्या सात-आठ वर्षांत! ‘ब्रुटली फेअर’ असा लौकिक असलेल्या ‘इकॉनॉमिस्ट’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या ६ मे २०१७च्या अंकाची ‛ The World’s most valuable resource is no longer oil, but data ’ या लांबलचक शीर्षकाची मुखपृष्ठकथा प्रसिद्ध झाली आहे. तिचं शीर्षकच सांगतं की, कालपर्यंत जगात सोनं, हिरे-मोती यांच्यापेक्षाही ऑईल हे मौल्यवान होतं, पण आता त्याची जागा ‘डेटा’नं घेतली आहे. आणि हे केवळ युरोप-अमेरिकेतच नाही, किंवा चीन-जपानमध्येच नाही, तर दक्षिण आफ्रिकेतल्या गरीब देशांपासून भारतातल्या दुर्गम म्हणाव्या अशा खेड्यांपर्यंत सर्वत्र ‘डेटा’ दिवसेंदिवस अधिकाधिक मौल्यवान, अधिकाधिक जीवनावश्यक होतो आहे.
   हा डेटा म्हणजेच ‘माहितीचा महाकाय ढिगारा’ आपल्या सर्वांचं वर्तमान वास्तव आहे. घटना पाहता पाहता व्हायरल होतात, पण माहितीच्या ढिगाऱ्यातून नेमकी घटना समजून घेणं अनेकदा शक्य होत नाही, ते झालं तर त्यातल्या वस्तुस्थितीविषयी नक्की कुणाला काही सांगता येत नाही. सत्याची एखाद-दुसरी बाजू समजून घेण्यासाठी मोठे प्रयास पडतात. त्यामुळे अनेकदा सामान्यांपासून सुशिक्षितांपर्यंत आणि बुद्धिजीवींपासून बुद्धिवाद्यांपर्यंत सर्वच जण गोंधळ, संभ्रम यांच्या आवर्तात किंवा नको इतक्या माहितीच्या कचाट्यात अडकलेले दिसतात.
     जॉन डाल्बर्ग-अॅक्टनचे एक उद्धरण अभ्यासायला होते. अॅक्टन म्हणतो, “ Every Power Tends To Currupt, And Absolute Power Tends To Corrupt Absolutely”. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचेही तसेच आहे. ते सापेक्षच हवे. ते जितके अधिक द्याल तितके ते स्वातंत्र्य भ्रष्ट होत जाते. आपल्या ग्रामीण भागांत “शिकलेले तितके हुकलेले” ही म्हण आहे, ती त्यांच्यासाठीच. त्यातूनच मग २६/११ सारखा हल्ला घडत असतानाच वाहिन्यांवर लाईव्ह दाखवून जिहाद्यांना अप्रत्यक्ष मदत करण्यापासून ते कलाकृतींच्या नावाखाली आपल्या आदर्शांना शिव्या घालण्यापर्यंत चाळे सुरू होतात. अश्यांचे तथाकथित स्वातंत्र्य त्या त्या वेळी चिरडलेच पाहिजे. हाच धर्म आहे. कारण, Absolute Power Tends To Corrupt Absolutely !!
     तुम्हाला वाटतं का की, तुम्ही सोशल-मिडियावर जे लिहिता, ते तुमचे विचार, तुमची अभिव्यक्ती असते म्हणून? जर हो, तर तुम्हाला ‘सोशल इंजिनियरिंग’ हा प्रकार समजून घेण्याची गरज आहे. सोशल इंजिनियरिंगचा राजकारण व समाजकारणात जो अर्थ असतो त्याबद्दल बोलत नाहीये मी. सोशल इंजिनियरिंग हा ‘इन्फर्मेशन सिक्युरिटी’ अर्थात माहिती-सुरक्षा क्षेत्रातला पारिभाषिक शब्द आहे. त्याचा अर्थ होतो ‘वापर करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या क्लृप्त्यांद्वारे तुम्हाला तुमची माहिती उघड करण्यास भाग पाडणे’.
आजच्या जगात माहिती ही ताकद आहे. तुमच्या वरकरणी निरुपद्रवी वाटणाऱ्या माहितीचा असा आणि इतक्या ठिकाणी वापर होतो की, तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. सिक्स की प्रिन्सिपल्स, डायव्हर्जन थेफ्ट, फिशिंग, प्रीटेक्स्टिंग, बेटिंग अश्या अनेक क्लृप्त्या त्यात येतात. सोशल मिडियावर हे प्रकार सर्रास चालतात. एखादा विषय कसा आणि कितपत ट्रेंडींग ठेवायचा याचे अल्गोरिदम्स(Algorithms) असतात. त्यात हितसंबंध गुंतलेले लोक हे अल्गोरिदम्स फिरवू, वळवू, मॅनिप्युलेट करू शकतात. आपल्या ते लक्षातही येत नाही.फार साधी गोष्ट सांगते. तुम्ही गुगलवर समजा रियल इस्टेटच्या संदर्भात सर्च केलात, तर तुम्हाला फेसबुकवरही हमखास घरे, जमिनी इ. च्या जाहिराती दिसू लागतात. तुमच्या फोनवर जर जीपीएस वापरत असाल, तर तुम्ही कधी, कुठे गेला होता याचा डेटा अनेक काळ जमा होत राहातो. इतकी बारीक नजर ठेवली जाते तुमच्यावर. गंमत म्हणून फक्त एकदा  myactivity.google.com ला भेट देऊन पाहा अथवा तुमच्या फोनवर असलेल्या गुगलमॅप्समध्ये टाईमलाईन नावाचा पर्याय वापरून पाहा. तुमच्या मिनिटामिनिटाचा ट्रॅक उपलब्ध असतो. तो भले फक्त तुम्हालाच दिसत असेल, पण माहिती अस्तित्वात आहे म्हणजे ती चोरता येऊ शकते. एखादी घटना घडली की, तात्त्विकदृष्ट्या त्या विषयावरील एका खास बाजूलाच अधोरेखित करणाऱ्या पोस्ट्स तुम्हाला दिसाव्यात असाही अल्गोरिदम मॅनिप्युलेट केला जाऊ शकतो, जेणेकरून तुमच्यावर तुमच्याही नकळत एक सामाजिक दबाव बनावा.
बरेचदा ‘लोक लिहिताहेत म्हटल्यावर आपणही अमुक विषयावर लिहिलंच पाहिजे’ आणि जनमानस या बाजूने आहे म्हणजे हीच बाजू बरोबर असणार, तेव्हा आपणही त्याच बाजूने लिहिलेच पाहिजे, किमानपक्षी एखादी पोस्ट फॉरवर्ड अथवा शेअर तरी केलीच पाहिजे’ असा अव्यक्त दबाव आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. त्यातून तुम्ही अनेकदा सोशल मिडियावर व्यक्त झाला असाल, होतदेखील असाल. ही सुद्धा तुमच्या नकळत होणारी एकप्रकारची सोशल इंजिनियरिंगच आहे! भले मग ती कुणी ठरवून करत असो  वा नसो.
आता परत एकवार विचार करा, तुम्ही सोशल मिडियावर जे जे लिहिता ते खरोखरच तुमचे विचार आणि तुमची अभिव्यक्ती असते का?
लेख:- दिपाली बिडवई
dipali.bidwai.9677@gmail.com
ट्विटर @BidwaiDipali 
◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: