पहिल्या भारतीय जैव इंधन विमानाची यशस्वी भरारी

‘स्पाइसजेट’च्या ‘Bombardier Q400’ या जैव इंधनावर चालणाऱ्या पाहिल्या भारतीय विमानाचे उड्डाण आज यशस्वीरित्या पूर्ण झाले.

 

नवी दिल्ली, २७ ऑगस्ट

 

जैव इंधनावर (बायोफ्युएल) चालणाऱ्या पहिल्या भारतीय विमानाची उड्डाणचाचणी आज यशस्वीपणे पार पडली. डेहराडून ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली यांदरम्यान ही चाचणी घेण्यात आली आहे. विमानसेवा देणाऱ्या ‘स्पाइसजेट’च्या ‘Bombardier Q400’ या विमानामध्ये जैव इंधन वापरून हे उड्डाण घेण्यात आले.

 

भारताच्या पहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाची आज यशस्वी उड्डाणचाचणी घेण्यात आली.

 

यामुळे आता भारताच्या आधुनिक तंत्रज्ञान वापरात व पर्यावरणपूरक धोरणांमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जैव इंधनांचा वापर करून विमान भरारी घेणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानंतर आता भारत देखील विराजमान झाला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांनी या विमानाचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले.

 

 

या विमानात ७५ टक्के विमानचालन झोतयंत्र इंधन (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) व २५ टक्के बायो फ्युएल (जैव इंधन) वापरण्यात आले होते. या विमानोड्डाण चाचणीच्या यशामुळे या जैव इंधनांचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो.

 

 

नुकतंच, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे ‘जैव इंधन धोरण’ जाहीर केले होते. त्यानंतर आज आपण याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. विमान क्षेत्रातील आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी कामगिरी असल्याचे पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारने जैव इंधन आणि इथॅनॉलवरील जीएसटीत कपात केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

जैव इंधन कसे तयार केले? 

१. जेट्रोफा या वनस्पतींच्या बियांपासून हे इंधन तयार करण्यात आले आहे. यापूर्वी हा प्रयोग फक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात करण्यात आला आहे.

२. या उड्डाणासाठी ‘कौन्सिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ आणि डेहराडूनच्या ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम’ यांनी संयुक्तपणे 400 किलो बायो जेट इंधन तयार केले.

३. विशेष म्हणजे हे जैवइंधन तयार करण्यात ५०० कुटुंबातील लोकांचाही समावेश होता.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: