भोंगा वाढ(ज)वला, तर सिग्नलही वाढेल !

मुंबई, १ फेब्रुवारी

अनावश्यकरित्या वाहनांचा भोंगा (हॉर्न) वाजवण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नवीन प्रयोग राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सिग्नल लाल असताना थांबलेल्या वाहनांच्या भोंग्यानी आवाजाची ८५ डेसीबलची पातळी ओलांडल्यास लाल सिग्नलच्या वेळ अजून वाढवण्यात येणार आहे. वाहनचालकांच्या बेशिस्तीला व हॉर्नहौसेला मोठ्या खोळंब्याचीच शिक्षा मिळणार आहे.

शहरांत ठिकठिकाणी सिग्नल लागलेले असतानासुद्धा बहुतांश वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवून पुढे थांबलेल्या वाहनांना इशारा करतात. यामुळे बहुदा या भोंग्यांच्या आवाजाची पातळी मर्यादेच्याही पलीकडे जाते आहे आणि ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरते. कित्येक ठिकाणी सिग्नलचा रंग लालवरून किती सेकंदात हिरवा होणार याविषयीही माहिती देण्यात येत असते. तरीपण, वाहनचालकांच्या हॉर्नहौसेपायी हॉर्न वाजणे काही थांबत नाही. वाहनचालकांच्या या हलगर्जीपणाला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवी योजना आखली आहे.  त्यानुसार, सिग्नल लाल असताना थांबलेल्या गाड्यांच्या भोंग्यांच्या आवाजाची पातळी ८५ डेसीबलपेक्षा जास्त आढळली, तर लाल सिग्नलचा वेळ वाढवण्यात येणार आहे. यामुळे सिग्नल लाल राहिल्याने त्याच्यासह अन्य वाहनचालकांचा आणखी खोळंबा होईल. हा खोळंबा हीच बेशिस्त चालकांसाठी शिक्षा असेल. वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी २०१९ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील चौकांमध्ये १० मिनिटांसाठी वाहनांच्या भोंग्यांच्या आवाजाची पातळी मोजणारी यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेतून संबंधित सिग्नलवरील आवाजाची पातळी ८५ डेसीबलची मर्यादा ओलांडते हे स्पष्ट झाले होते. तेव्हा लाल सिग्नल हिरवा होण्याऐवजी पुन्हा दिड मिनिटांसाठी लाल ठेवण्यात आला. त्यामुळे, बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी व हॉर्नमुळे पादचारी-रहिवाशांना काय त्रास होतो, याची जाणीव करून देण्यासाठी अशा शिक्षा देण्याचे वाहतूक पोलिसांनी ठरवले आहे.

मुंबई महापालिकेकडून अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई

सुरुवातीला या प्रयोगाअंतर्गत थेट कारवाई सुरू करण्याऐवजी पोलिसांद्वारे जनजागृती करणारी चित्रफीत  समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्यात आली आहे. त्यावरील नागरिकांचा प्रतिसाद, प्रतिक्रिया लक्षात घेऊन प्रयोग सुरू करण्यात येणार आहे व सोबतच, यया कारवाईमुळे वाहतुकीचा खोळंबा, त्याचे परिणाम आदींचाही अभ्यास केला जाणार असल्याचे, मधुकर पांडे यांनी सांगितले आहे. बहुतांश वाहने वातानुकुलीत असल्याने आपल्याच हॉर्नचा किती त्रास होतो याची जाणीव चालक, प्रवाशांना होत नाही. मात्र पादचारी, आसपासची वस्ती, रुग्णालये, शाळांना या कलकलाटाचा प्रचंड त्रास होतो, अशी प्रतिक्रियाही वाहतूक पोलीसांनी व्यक्त केली आहे.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: