६६वे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १२ ते १६ डिसेंबर रोजी आयोजित होणार!

पुणे, १० ऑक्टोबर

 

६६ वे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल, मुकुंदनगर येथे आयोजित होणार

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित केला जाणारा मानाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या १२ ते १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल, मुकुंदनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी प्रथमच पुण्याच्या मध्यवर्ती भागाला सोडून हा महोत्सव मुकुंदनगर येथे पार पडणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे.

६६वे सवाई गंधर्व महोत्सव यावर्षी मुकुंदनगर येथे आयोजित होणार आहे.  याआधी गेली बत्तीस वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत असे. यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखीपत्र दिल्याने महोत्सवाच्या जागेत बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे मान्य केले आहे, याबद्दल श्रीनिवास जोशींनी आभार व्यक्त केले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव अभिजात संगीतांसह अत्यंत दिमाखात साजरा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

♦♦♦

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: