आता सिगरेट-तंबाखू पाकीट म्हणतील ‘आजच सोडा!’
सिगरेट-तंबाखू पाकिटांवरील स्वास्थ चेतावणीसाठी शासनाने जाहीर केलेत ‘आजच थांबवा’ संदेश असलेले दोन नवे ‘सुचना-चित्र’.
नवी दिल्ली,
स्वास्थ आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी तंबाखू आणि सिगरेटच्या पाकिटांवर स्वास्थ विषयक चेतावणी देणारे दोन नवे ‘सुचनाचित्र’ जाहीर केले आहेत. या नव्या सुचनाचित्रांवर ‘आजच सोडा’ हा संदेश असणार आहे. यासोबतच त्याखाली तंबाखू किंवा सिगरेट सोडू इच्छिणाऱ्यांसाठी ‘१८००-११-२३५६’ हा मदत व मार्गदर्शन क्रमांकही असणार आहे.
पहिल्या चित्राचा सक्रिय वापर हा १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्याची वैधता बारा महिन्यांसाठी आहे. या मुदतीनंतर दुसऱ्या चित्राचा वापर एक वर्षासाठी सिगरेट-तंबाखूच्या पाकिटांवर होणार आहे.
‘१ सप्टेंबर २०१८ नंतर निर्मित, आयतीत किंवा पाकीटबंद केल्या जाणाऱ्या तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर पहिले सुचनाचित्र प्रदर्शित केले जाईल. त्यानंतर १ सप्टेंबर २०१९ पासून दुसऱ्या सुचनाचित्राचा वापर होणार आहे’, असे मंत्रालयाने जाहीर केलेल्या सुचनेत म्हटले आहे.
जी कोणतीही व्यक्ती अशा पदार्थांच्या उत्पादनात, आयातीत किंवा विक्रीत सहभागी असेल त्यांनी या बदलांची नोंद घ्यावी. मूळ सुचनाचित्रात नमूद वाक्यच पाकिटांवर वापरले जावे, अशी ताकीदही मंत्रालयाने दिली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘ दिलेल्या सूचनांचे पालन न करणे हा दंडनीय अपराध आहे. अशावेळी सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ ( प्रतिबंध) कायदा २०१३च्या भाग २० नुसार गुन्हेगाराला कारावास किंवा आर्थिक भरपाईची शिक्षासुद्धा होऊ शकते.’
याआधी, या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर ८५ टक्के जागेत स्वास्थ चेतावणी देण्याच्या नियमाला पुढेही सुरू ठेवण्यास संमती दिली होती.
◆◆◆◆