देशातील सर्वात जास्त डेटा केंद्र मुंबईत
मराठी ब्रेन वृत्त
मुंबई, ८ नोव्हेंबर
‘सीबीआरई साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वात जास्त डेटा सेंटर्स देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये असल्याचे माहीत झाले आहे. देशातील एकूण डेटा सेंटर्सपैकी ३५, म्हणजेच २८ टक्के डेटा सेंटर्स मुंबईत आहेत.
देशातील एकूण डेटा केंद्रांच्या २८ टक्के डेटा केंद्र मुंबईत असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. ही संख्या कोणत्याही एका शहरात असलेल्या डेटा सेंटर्सच्या संख्येत सर्वाधिक आहे. ई-कॉमर्स व डिजिटायझेशनच्या या काळात आज प्रत्येक क्षणाला संबंधित कंपन्यांना डेटा सेंटर्सची गरज भासत असते. त्यामुळेच त्यांची संख्या वाढल्याचे सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.
दिवाळीनिमित्त रिलायन्स जिओची ग्राहकांना आकर्षक भेट
सीबीआरईने देशभरातील शहरांमध्ये असलेल्या डेटा सेंटर्सचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणानुसार, डेटा सेंटर्सच्या संख्येत मुंबई अग्रणी आहे. मुंबईनंतर देशातील सर्वाधिक डेटा सेंटर्स प्रामुख्याने दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर), बंगळुरू, चेन्नई, पुणे, हैदराबाद व कोलकाता या सात शहरांमध्ये आहेत. सात या शहरांतील डेटा केंद्रांची एकूण संख्या मिळून १३३ आहे. त्यांपैकी ३५ सेंटर्स मुंबईत, त्यापाठोपाठ बंगळुरूमध्ये २७, तर दिल्ली-एनसीआरमध्ये १९ डेटा सेंटर्स आहेत. पुण्यात पाच सेंटर्स आहेत.
आंतरजाल (इंटरनेट ) आणि वाढत जाणाऱ्या आंतरजाल वापरामुळे अॅपआधारित व्यवसाय क्षेत्र व देवाणघेवाण वाढत चालली आहे. यामुळे येत्या काळात देशातील प्रमुख शहरांखेरीज अन्य भागातही डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणात उभे होण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. झारखंड व छत्तीसगड हे राज्य यामध्ये समोर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान व तंत्रज्ञान आधारित सेवा क्षेत्रातील डेटा सेंटर्स उभे होत आहेत. यातून येत्या काळात अतिरिक्त रोजगार निर्मित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे सर्वेक्षणातून समजते.
◆◆◆