राज्यातील ३ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर
महाराष्ट्रातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच लातूर जिल्ह्याचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशभरातील एकूण ५२ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांपैकी ग्रामीण भागातील ३७ व शहरी भागातील १५ शाळांचा समावेश आहेत. या ५२ शाळांपैकी ४५ शाळा या शासकीय किंवा शासकीय अनुदानप्राप्त आहेत, तर ७ शाळा खाजगी आहेत
● लातूर जिल्ह्याला ३ पुरस्कार :
१. राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील दोन शाळांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यामध्ये निलंगा तालुक्यातील ‘जाऊ’ येथील मुलींची शासकीय निवासी शाळेला स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलींद शंभरकर, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय मुख्यम आणि विद्यार्थ्यांनी स्वीकारला.
२. लातूर जिल्ह्यातीलच ‘बाऊची’ येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेला स्वच्छतेचे निकष पूर्ण केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सामाजिक न्याय आयुक्त, शाळेचे मुख्याध्यापक श्री. जमादार आणि विद्यार्थी यांनी स्वीकारला.
३. लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे, या जिल्ह्याला विशेष पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
देशभरातील केवळ ९ जिल्ह्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● हिंगोलीतील गोटेवाडीच्या आश्रम शाळेला पुरस्कार
गोटेवाडीतील पोस्ट बेसिक आश्रम शाळेला ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरिवण्यात आले. हा पुरस्कार आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. विशाल राठोड, मुख्याध्यापक साहेबराव आवचर आणि विद्यार्थी यांनी स्वीकारला.
● पुरस्काराचे स्वरूप:
राष्ट्रीय ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व ५० हजार रूपये असे आहे. हे ५० हजार रूपये शाळांच्या खात्यात डिजिटल सेवेअंतर्गत जमा करण्यात येणार आहेत.
यावेळी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, केंद्रीय शालेय शिक्षण विभागाच्या सचिव रिना रे, सहसचिव मनिष गर्ग, सीबीएससीच्या अध्यक्ष अनिता करवाल उपस्थित होते.
( राज्य माहिती महासंचालनालयाच्या संदर्भांसह)
◆◆◆
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.com