स्वाईन फ्लू : दक्षता हाच सर्वोत्तम उपाय
मराठी ब्रेन,२६ ऑक्टोबर
सध्या पाऊस आणि वातावरणातील बदल यांमुळे डासांची संख्या आणि परिणामी स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होणे शक्य आहे. इन्फ्लुएंझा हा हवेवाटे आणि खोकला, शिंक याद्वारे उडालेल्या थेंबांनी, दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने पसरणारा आजार आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच 48 तासांच्या आत उपचार सुरू करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे आणि खबरदारी घेणे हेच सर्वोत्तम उपाय आहेत. याबाबत स्वतः काळजी घेणे आणि इतरांना घेण्यास सांगणेही तितकेच गरजेचे आहे. वेळीच खबरदारी घेतली तर यामधून आपला बचावू शकतो.
स्वाईन फ्लूचा होत असलेला प्रसार ही जरी काळजीची बाब असली, तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. स्वाईन फ्लूबाबत वेळीच दक्षता घेतल्यास या साथीवर आपण मात करु शकतो.
स्वाईन फ्लू म्हणजे इन्फ्लुएंझा ‘एच 1 एन 1’ हा आजार विषाणूपासून होतो. या आजारामध्ये बाधित व्यक्तीस सर्वसाधारणपणे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे व दुखणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे व क्वचित प्रसंगी उलट्या, जुलाब इत्यादी लक्षणे दिसून येतात. इन्फ्लुएंझा ए एच 1 एन 1 विषाणू हवेतून पसरतो व त्याचा अधिशयन कालावधी 1 ते 7 दिवसांपर्यंत आहे. इन्फ्लुएंझा हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. परंतु काही उच्चरक्तदाब, मधुमेह व स्थुलपणा असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. दरवर्षी ‘इन्फ्लुएंझा लसीकरण’ हा आजार टाळण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर माता, फ्ल्यू रूग्णोपचारात सहभागी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी या अतिजोखमीच्या व्यक्तींनी इन्फ्लुएंझा लस घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी तापावरची औषधे घेऊ नयेत.
स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीने घाबरुन न जाता शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरी विश्रांती घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच खोकताना व शिंकताना नाका-तोंडाला चार पदराची घडी करून रूमाल धरावा. वारंवार साबणाने व पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. पौष्टिक आहार तसेच लिंबू, आवळा, मौसंबी व संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांचा आहार घ्यावा व भरपूर पाणी प्यावे. पुरेशी झोप घ्यावी, अतिताण जागरण करू नये. इतस्तत: थुंकू नये. फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. फ्ल्यूवर प्रभावी औषध उपलब्ध आहे. फ्ल्यूची लक्षणे सुरू झाल्यापासून 2 दिवसात ऑसेलटॅमीवीर हे औषध सुरू केल्यास ते अधिक प्रभावी ठरते. बरे वाटले तरी ऑसेलटॅमिव्हीर गोळ्यांचा पाच दिवसांचा पूर्ण डोस घेणे आवश्यक आहे.
स्वाईन फ्लूच्या अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये 5 वर्षाखालील मुले आणि त्यातही विशेष करून 1 वर्षाखालील बालकांचा समावेश होतो. विविध जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्ल्यूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे.
स्वाईन फ्लू रोगास प्रतिबंध आणण्यासाठी खालील गोष्टी प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे.
● हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो.
● लक्षणे
ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी खोकला, घसा दुखणे, अतिसर, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे.
● हे करा
हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. गर्दीच्या ठिकाणी व संपर्काच्यावेळी रूमाल व मास्क वापरावा. स्वाईन फ्ल्यू रूग्णापासून किमान एक हात दूर रहा. खोकताना, शिकताना तोंडाला रूमाल लावा. भरपूर पाणी प्या. पुरेशी झोप घ्या. पौष्टिक आहार घ्या.
● हे टाळा…
हस्तांदोलन अथवा आलिंगण, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, अफवा पसरविणे, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे. फ्ल्यू सारखी लक्षणे अंगावर काढू नका.
● अति जोखमीचे रूग्ण:
5 वर्षापेक्षा लहान बाळ, 65 वर्षांपेक्षा मोठी व्यक्ती, गर्भवती महिला, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, यकृताचे आजार, मुत्रपिंड, दमा आजार असणाऱ्या व्यक्ती, रक्ताचे व मेंदूचे आजार असणारे रूग्ण, एच.आय.व्ही./एड्सचे रूग्ण, खूप कालावधीसाठी स्टेरॉईड घेणारे व्यक्ती उदा. दमा असलेल्या व्यक्ती.
● आजारी असाल तर,
शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरीच विश्रांती घ्या. पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्या.
संकलन : शंकरराव पवार
जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
(प्रस्तुत लेख हा आजारासंबंधीच्या जनजागृती आणि संबंधित आजाराची सामान्य माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने इथे प्रकाशित करण्यात आला आहे.)
◆◆◆
तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि लिखाणाचे writo@marathibrain.com वर स्वागत आहे.