हरमनप्रीत ठरली पहिली भारतीय महिला शतकवीर
गयाना, १० नोव्हेंबर

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात कर्णधार हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या शानदार शतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने काल न्यूझीलंडचा 34 धावांनी धुव्वा उडवला. विश्वचषकाच्या सलामी सामन्यातच भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला.
टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात काल न्यूझीलंड संघाला 34 धावांनी हरवत भारतीय महिला संघाने त्यांची दमदार खेळी प्रदर्शित केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये हरमनप्रीत कौरचे शानदार शतक (103 धावा, 51 चेंडू ) आणि रॉड्रिग्जच्या 59 धावांचा समावेश आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 9 बाद 160 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सुझी बिट्सने एकाकी झुंज देताना 67 धावांची खेळी केली.

भारताकडून शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना हेमलताने 26 व पूनम यादवने 33 धावा देत प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर राधा यादवने दोन व अरुंधती रेड्डीने एक विकेट काढली.
● हरमनप्रीत: पहिली भारतीय महिला शतकवीर
कालच्या दमदार शतकामुळे हरमनप्रीत कौर ट्वेंटी क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. कालच्या सामन्यात 103 धावांची दमदार शतकीय खेळी करत हरमनप्रीत कालच्या विजयाची मानकरी ठरली. त्या 103 धावांमध्ये सात चौकार आणि आठ षटकारांचा समवेश आहे. यावेळी तिला रॉड्रिग्जच्या 59 धावांचीही उत्तम साथ लाभली. त्यात सात चौकारांचा समावेश आहे.

कालच्या सामन्यात हरमनप्रीत आणि रॉड्रिग्ज, या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली. महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात ‘अर्धशतक ठोकणारी सर्वात तरुण फलंदाज’ असा विक्रम आता जेमीमाच्या नवे झाला आहे.
♦♦♦