आयआयटींमध्ये पाच वर्षांत ५० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या !
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षणक्षेत्रात नामांकित मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) १० संस्थांमध्ये गेल्या पाच वर्षांत २७ विद्यार्थ्यांसह, जवळपास २३ आयआयटीमध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
देशातील नामांकित मानल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना विविध कारणांनी आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाला बळी पडावे लागते. याविषयीचा अधिक तपशील व आकडेवारी जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी गेल्या पाच वर्षांत देशातील ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थां’मध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारी काय, याविषयी उच्च शिक्षण विभागाला प्रश्न विचारले होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने यावर दिलेल्या उत्तरातून देशातील १० आयआयटीत गेल्या पाच वर्षांत, म्हणजेच सन २०१४ ते २०१९ या कालावधीत एकूण २७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले आहे. या १० संस्थांच्या यादीत आयआयटी मद्रास (IITM) पहिल्या क्रमांकावर असून, गेल्या पाच वर्षांत इथे ७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
हेही वाचा : ‘उच्च शिक्षणाची दैनावस्था : भाग ३’
विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या संस्थांच्या या यादीत आयआयटी खडकपूर (IITK) द्वितीय स्थानी असून येथील ५ विद्यार्थ्यांनी, तर आयआयटी दिल्ली (IITD) व आयआयटी हैदराबाद (IITH) येथील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती या उत्तरातून समोर आली आहे. तसेच, आयआयटी मुंबई, गुवाहाटी आणि रुडकी संस्थांमधील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यानी स्वतःचे जीवन संपवले आहे.
सन २०१४-१९ या कालावधीत स्वतःचे जीवन संपुष्टात आणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादी फक्त १० राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांपर्यंतच मर्यादित नसून, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठ (IIT-BHU), इंंडियन स्कुल ऑफ माईन्स, धनबाद आणि आयआयटी कानपूर येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांलाही आत्महत्येच्या आहारी जावे लागले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शाळा दूर असलेल्यांना विद्यार्थ्यांना मिळणार वाहतुक भत्ता
दरम्यान, मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतरंग कार्य करणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागे काय कारण होते, हे मात्र सांगितलेले नाही. तसेच, देशातील प्रमुख तंत्रज्ञान संस्थांतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याविषयीही गौर यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत संबंधित कार्यालयाकडे विचारणा केली होती.
◆◆◆