‘एचपी’ च्या सुमारे ५०० भारतीय कर्मचाऱ्यांनाही गमवावी लागू शकते नोकरी !
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
संगणक आणि प्रिंटर उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘हॅवलेट अँड पॅकार्ड’ (एचपी) या कंपन्यांच्या भारतातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच, जगभरातील सुमारे ९ हजार एचपी कर्मचाऱ्यांना कंपनीद्वारे नोकरीवरुन काढण्यात येऊ शकते.
आर्थिक मंदीच्या होणारे परिणाम आता जवळपास सर्वच क्षेत्रात दिसू लागले आहेत. संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एचपी कंपनीच्या हजारों कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वर्ष 2020 पर्यंत जगभरातील सुमारे ७ ते ९ हजार कर्मचारी कमी केले जाणार असल्याची शक्यता कंपनीद्वारे मागील आठवड्यात वर्तवण्यात आली आहे. त्यातल्या त्यात भारतातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनाही एचपीची नोकरी गमवावी लागू शकते
हे वाचलंत का? जाणून घ्या ५जी तंत्रज्ञानाबद्दल!
जास्त नफा आणि कमी उत्पादन खर्च या कार्यप्रणालीचा अवलंब एचपी करणार असल्याने कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. कंपनीच्या या नव्या कार्यप्रणालीबाबत माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राला माहिती देताना म्हटले की, ” काही मॉडल्सचे उत्पादन कंपनीने थांबवले आहे. सोबतच, खाजगी संगणकांच्या मागणीत सातत्याने घट होत असल्याने भारतातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणे निश्चित आहे.” सद्या जगभरात ‘एचपी’चे ५५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, एक महिन्यापूर्वी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात झालेल्या बदलानंंतर कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे.
PC maker HP to cut up to 9,000 jobs in restructuring push By Reuters https://t.co/bfxoICn8o6 pic.twitter.com/w9Bav6HPmv
— Sam Schout (@easytradingsign) October 4, 2019
दुसरीकडे, द हेड हंटर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस लक्ष्मीकांत यांच्यानुसार, ”भारत हा एचपीसाठी मुख्य लक्ष्य असलेल्या देशांपैकी एक आहे, मात्र नव्या धोरणानुसार एचपी इंडियाकडून सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते.” दरम्यान भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीत कपात करण्याचे एचपीद्वारे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. मात्र, जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची होत असलेली कपात बघता, जर भारतातही सारखेच धोरण अवलंबले गेले तर जवळपास ५०० कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागू शकते.
◆◆◆