खेळरत्न पुरस्कारासाठी अश्विन व मिथाली राजच्या नावांची शिफारस
वृत्तसंस्था | एएनआय
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) यंदाच्या राजीव गांधी खेळरत्न पुरस्कारासाठी आर. अश्विन आणि मिथाली राज यांच्या नावांची शिफारस करण्याची निर्णय घेतला आहे. सोबतच, अर्जुन पुरस्कारासाठी के. एल. राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांची नावे शासनाकडे पाठवण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे.
या घडामोडींची माहिती असलेल्या एका सूत्राकडून एएनआयला संबंधित खेळाडूंची नावे कळली आहेत. “विविध पुरस्कारांसाठी नावे सुचवण्या संदर्भात आमच्यात दीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर प्रसिद्ध गोलंदाज आर. अश्विन व भारतीय महिला संघाची स्किपर मिताली राज यांची नावे राजीव गांधी खेळरत्न पुरस्कारासाठी शासनाला पाठवण्याचे निश्चित झाले. सोबतच, यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी परत एकदा शिखर धवनचे नाव पाठवण्याचा निर्णय झाला असून, यासाठी अजून जसप्रीत बुमराह व के एल राहुलच्या नावाचाही समावेश आहे”, असे सूत्राने सांगितले.
वाचा | हरमनप्रीत ठरली पहिली भारतीय महिला शतकवीर
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने २०२१ च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन भरण्यात मुदतवाढ केली आहे. आधी नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख २१ जून ही होती.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र क्रीडापटूंची/प्रशिक्षकांची/संस्थांची/विद्यापीठांचे नामांकन/अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे, आणि ते मंत्रालयाला ईमेलच्या माध्यमातून पाठवायचे आहेत.
मागील वर्षी पहिल्यांदाच एकसोबत पाच खेळाडूंना राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मणिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगट, राणी रामपाल आणि मारियाप्पन फंगावेलु यांना मागील वर्षी खेळरत्न पुरस्कार प्राप्त झाला.
अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.
👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.
📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.