जुलैअखेर ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजना लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
येत्या ३१ जुलैपासून देशभरात ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका‘ (One Nation, One Ration Card) योजना लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल (मंगळवारी) केंद्र शासनाला दिला आहे. तसेच, कोव्हिड-१९ची स्थिती कायम असेपर्यंत स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य स्वस्तधान्य दुकानांमार्फत उपलब्ध करून घ्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
न्या. अशोक भूषण व न्या. एम.आर शहा यांनी अंजली भारद्वाज, हर्ष मंदर व जगदीप चोकर या तीन सामाजिक कार्यकर्त्यांच्या विनंतीवर काल सुनावणी केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाला ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ धोरण लागू करण्याचे आदेश दिले. याअंतर्गत असून त्यात केंद्र व राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी अन्न सुरक्षा, रोख हस्तांतरण व इतर कल्याणकारी योजना लागू कराव्यात असे न्यायालयाने सांगितले आहे.
वाचा | ९ मोठ्या घोषणांसह ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ देशभर लागू करण्याचा निर्णय
“संचारबंदी व टाळेबंदीमुळे स्थलांतरित कामगारांचे रोजगार गेले आहेत. या स्थळांतरितांना दुसऱ्या लाटेचाही मोठा फटका बसला आहे. एक राष्ट्र, एक शिधापत्रिका योजना गरीब नागरिकांच्या कल्याणासाठी असून, त्यांना त्यांच्या इतर राज्यातील कामाच्या ठिकाणी मोफत शिधा उपलब्ध करून द्यावा. त्यावेळी त्यांची शिधापत्रिका कोणत्या राज्यातली आहे याचा विचार करू नये”, असे न्यायालयाने म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेश देताना म्हटले, की असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राने (NIC) शासनाला मदत करावी. तसेच, सर्व कल्याणकारी योजना ३१ जुलैपासून लागू करण्यात याव्यात. आंतरराज्य स्थलांतरित कामगारांसाठीचे कंत्राटदार व आस्थापनांची रोजगार व सेवा नियम कायदा, १९७९ अन्वये नोंदणी करण्यात यावी.
हेही वाचा 👉 अजून पुढील पाच महिने मिळणार अतिरिक्त अन्नधान्य !
न्यायपीठाने अंजली भारद्वाज, हर्ष मंदर व जगदीप चोक यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील आपला निकाल ११ जून रोजी राखीव ठेवला होता. आणखी एक स्वयाचिका न्यायालयाने गेल्या वर्षी मे महिन्यात दाखल केली होती. त्यात नमूद करण्यात आलेल्या समस्यांची दखल घेण्यात आली आहे.
अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.
👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.
📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.