पॅन-आधार जोडण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मुंबई, २८ सप्टेंबर

पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांची परस्पर जोडणी (लिंक) करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन-आधार लिंकिंगची मुदत येत्या ३० सप्टेंबरला संपणार होती, ती आता नव्याने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एक परिपत्रक जारी करून ही मुदतवाढ जाहीर केली आहे.

देशातील ज्या नागरिकांनी अजूनही पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांना लिंक केले नाहीयेत, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कर विभागाने परत एकदा दिलासा दिला आहे. पॅन आणि आधार लिंकिंग करण्याची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वाढवून आता ३१ डिसेंबर २०१९ केली आहे. सोबतच, जर नागरिकांनी आपले पॅन आणि आधार क्रमांक नव्या मुदतीपर्यंत जोडले नाहीत, तर ते चालू स्थितीत राहणार नाहीत आणि त्यामुळे या क्रमांकांच्या मदतीने होणारे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, असेही सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : ‘मास्क्ड आधार’ म्हणजे काय?

● पॅन आणि आधार लिंक करताना

पॅन आणि आधार क्रमांक प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) विभागाच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाईल एसएमएसच्या सहाय्याने लिंक करता येते. मात्र, हे क्रमांक जोडताना नाव, जन्मतारिख बरोबर आहे की नाही, याची पडताळणी करुन घेणे गरजेचे आहे. जर यामध्ये चूक असेल, तर आधी ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल. आधारमध्ये सुधारणा करण्यासाठी युआयडीएआयकडून आणि पॅनमध्ये सुधारणा करण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून मदत घ्यावी लागेल.

आधारमुळे दूरध्वनी क्रमांक बंद पडणार नाही!

दरम्यान, पॅन आणि आधार क्रमांक जोडण्यासाठी अर्थमंत्रालय व प्रत्यक्ष कर मंडळाकडून आतापर्यंत अनेक वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. देशात सध्या २५ कोटी नागरिकांकडे पॅन कार्ड आहेत, तर १११ कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आले आहेत. दुसरीकडे, प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, ८.४७ कोटी नोंदणीकृत ग्राहकांपैकी आजपर्यंत फक्त ६.७७ कोटी ग्राहकांनी त्यांचे पॅन क्रमांक आधारशी लिंक केले आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी आधार-पॅन परस्पर जोडणे गरजेचे आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: