चीन भारताशी असलेले मतभेद वादात बदलणार नाही
ब्रेनवृत्त, ९ जून
पूर्व लडाखमधील सीमाभागात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. लडाखमध्ये भारत – चीन सीमेवरील तणाव गंभीर असून, याबाबत दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये या तणावाबाबत चर्चा झाली. त्यानंतर भारतातील चीनचे राजदूत सून विडोंग यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हू चुनयिंग यांची भूमिका मांडली. यांनी विडोंग ही भूमिका ट्वीटर च्या माध्यमातून स्पष्ट केली आहे.
”चीन भारताशी असलेले मतभेद वादाच्या रुपात बदलू देणार नाही. तसेच, दोन्ही देशांचे सीमा विवाद चर्चेच्या माध्यमातून सोडवावेत, अशी इच्छा आहे. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल”, असे चूनयिंग यांचे म्हणणे आहे.
तसेच, भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे यावेळी चुनयिंग यांनी म्हटले आहे. ”वादग्रस्त सीमाभागात दोन्ही देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे. भारत आणि चीनकडे हा विवाद मिटविण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही आहे. तसेच, परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणाखाली असून सीमाभागासंबंधी प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देश विचार-विनिमय करण्यास तयार आहेत, असेही चूनयिंग म्हणाल्याचे विडोंग यांनी सांगितले.
अमेरिकेचा चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी न करण्याचा इशारा !
दरम्यान, लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या मुद्यावरून नुकतीच (शनिवारी) दोन्ही देशांच्या सैन्यदलाची चर्चा झाली. यात भारताच्या बाजूने लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी प्रतिनिधित्त्व केले, तर चीनच्या झिनजियांग मिलिटरी रीजनचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांनी चीनचे प्रतिनिधित्त्व केले. तथापि, हु चूनयिंग यांनी या बैठकीनंतर दोन दिवसांनी आपली भूमिका मांडली आहे.
दुसरीकडे, ”पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर लवकरात लवकर तोडगा हवा आहे, अशी भूमिका भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केली. तसेच, दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.