‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमाची उत्साहात सांगता
‘देव द्या, देवपण घ्या’ या उपक्रमाचे ८वे सत्र नाशिकमध्ये उत्साहात पार पडले.
ब्रेनवृत्त । नाशिक
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षणार्थ विद्यार्थी कृती समिती आयोजित, ‘देव द्या, देवपण घ्या’ या उपक्रमाची शहरातील गोदापार्क येथे काल उत्साहात सांगता झाली. गणेश विसर्जनाच्या वेळी सुमारे ११,२५८ भाविकांनी गणेशमूर्ती दान दिल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली.
गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात रासायनिक रंगकाम, इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. या प्रदूषणाला आळा बसावा म्हणून शहरातील विद्यार्थी कृती समितीतर्फे गेल्या ८ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षीही गणेशोत्सवातील दहा दिवस विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत व घरोघरी जाऊन जनजागृती करणारे पत्रक वाटले होते. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार प्रसार करण्यात आला होता. नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला असल्याची महिती समितीचे अध्यक्ष पगार यांनी दिली.
विसर्जनाच्या दिवशी सकाळी १० वाजेपासूनच विद्यार्थी कृती समितीचे सुमारे ३०० कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. ६ फुटापेक्षा जास्त उंचीच्या विविध मंडळाच्या व घरगुती गणेशोत्सवातील मूर्तीही यावेळी दान करण्यात आल्या. त्यांतर त्या मूर्ती महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या.
या उपक्रमाच्या व विसर्जन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष आकाश पगार यांच्या नेतृत्वाखाली समितीचे कार्यकर्ते विशाल गांगुर्डे, जयंत सोनवणे, वैष्णवी जोशी, रसिका सावंत, दीपाली जाधव, स्नेहा पवार, भूषण पाटील व इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in