‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमाचे ११वे सत्र नाशिकमध्ये उत्साहात संपन्न!

ब्रेनवृत्त | नाशिक


कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) नियम पाळत तसेच मुखपट्टी, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर करत नाशिककरांच्या ‘देव द्या, देवपण घ्या’ या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमाची सलग ११ व्या वर्षीही मोठ्या उत्साहात सांगता झाली.

“देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरातील चोपडा सभागृहाजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुखपट्ट्या (फेस मास्क) व हातमोजे घालून विशेष दक्षताही घेतली. घरगुती गणेशोत्सवातील गणेश मूर्ती दान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. तसेच गणपतीच्या मूर्तीवर देखील सॅनिटायझरचा फवरला केल्यानंतरच ती मूर्ती स्वीकारली जात होती. मराठमोळे अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी देखील मूर्ती दान करत ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमात विशेष सहभाग घेतला.

“देव द्या, देवपण घ्या!” या उपक्रमास सलग ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. “देव द्या, देवपण घ्या हा कौतुकास्पद उपक्रम असल्याने माझ्या घरची गणेश मूर्ती देखील मी आकाश पगार यांच्याकडे सुपूर्द केली. या उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत”, असे खांडकेकर यावेळी बोलताना म्हणाले. 

विशेष म्हणजे,  “देव द्या, देवपण घ्या” या उपक्रमाची सुरुवात ही ११ वर्षांपूर्वी पर्यावरण प्रदूषणाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने तसेच निर्माल्य यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे, यावर प्रभावी उपाय म्हणून नाशिकमधील विद्यार्थी कृती समितीतर्फे गेल्या ११ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो.

 हे नक्की वाचा – ‘ट्विटरकट्टा’ उपक्रमाबद्दल

गणेशोत्सवातील १० दिवस विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारी पत्रके घराघरात वाटली होती. तसेच समाज माध्यमांतूनही प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते. नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला. दिड, पाच व सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील या उपक्रमांतर्गत स्वीकारण्यात आल्या.

‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमांर्तगत गणेश मूर्ती स्वीकारताना विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार व कार्यकर्ते.

विसर्जनाच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासूनच विद्यार्थी कृती समितीचे स्वयंसेवक गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. पोपटी रंगाचे शर्ट, फेस शिल्ड, फेस मास्क व हातमोजे घातलेले हे कार्यकर्ते सर्व नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मूर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. 

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, मोनाली गवे, सागर बाविस्कर, प्रतीक्षा वखरे, जयंत सोनवणे, स्नेहा आहेर, संकेत निमसे, जयश्री नंदवानी, तुषार गायकवाड, भाग्यश्री जाधव, रोहित कळमकर, विशाखा वाखारे, कोमल कुरकुरे, भावेश पवार, दुर्गा गुप्ता, प्रकाश चितोडकर, सुशांत पाटील, सागर बच्छाव, तुषार इप्पर, प्रणव पगारे, निलेश मोरे, पुरुषोत्तम नागरे, आकाश रायते, सोनू आहेर, रितेश लोखंडे, संचित शेळके व समितीच्या इतर सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: