सन २०७० मध्ये ‘एक तृतीयांश’ लोकसंख्या असेल अतिउष्ण प्रदेशात !

जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनातून येत्या पन्नास वर्षांत जगाला भयंकर उष्णेतेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. २०७० पर्यंत जगातील सुमारे १/३ लोकसंख्येला अतिशय उष्ण प्रदेशांत राहावे लागेल, असे या अहवालातून समोर आले आहे.

 

ब्रेनविश्लेषण | जागतिक तापमान वाढ

कोव्हिड-१९‘ सारख्या महामारीने जग आधीच ग्रासलेले असताना, परत एक नवे पर्यावरणीय संकट उभे राहणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. तसेच, या संकटाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश असणार आहे. येत्या ५० वर्षांत सुमारे १२० कोटी लोकांना भयंकर उष्णतेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ब्रिटनमधील एक संशोधक समूहाच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

ब्रिटनच्या एक्झीटर विद्यापीठातील संशोधक टिम लेंटन आणि समूहाने मिळून जागतिक तापमान वाढीच्या भविष्यातील संभाव्य संकटांविषयी संशोधन केले आहे. यातून, येत्या काळात भारतासह जागतिक अनेक महत्त्वाच्या शहरांना अतिउष्णतेच्या संकटाला सामोरे जावे लागेल. राष्ट्रीय विज्ञान अकादमीद्वारे प्रकाशित लेंटन यांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, येत्या 50 वर्षात जवळजवळ 120 कोटी लोकांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हा उन्हाळा अगदी सहारा वाळवंटात असणाऱ्या तापमानाप्रमाणे असेल. अशी परिस्थिती येण्यामागचे कारण म्हणजे जागतिक तापमानात होणारी वाढ असून, पर्यावरण प्रदूषण, झाडे तोडणे आणि हवामान बदल यांमुळे ही उष्णता वाढणार आहे. या समस्येचा सर्वाधिक फटका भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानसह 10 देशांना बसणार आहे.

हेही वाचा : ओझोनचा थर : पृथ्वीवरील जीवसृष्टीचा संरक्षक

भविष्यात संभावित असलेल्या या संकटविषयी चिंता व्यक्त करताना टिम लेंटन म्हणाले की, “हे आकडे पाहून मी स्तब्ध झालो आहे. मला विश्वास बसत नव्हता, म्हणून मी हे आकडे बर्‍याचदा तपासले, पण ते खरे आहेत. मानवाला या ग्लोबल वार्मिंगचा सर्वात मोठा धोका आहे.” टिम लेंटन यांच्या माहितीनुसार, भारतातील सुमारे 120 कोटी लोकांना सहारा वाळवंटासारख्या उष्णतेत रहावे लागेल. दुसरीकडे, नायजेरियातील 48.5 कोटी, पाकिस्तानमधील 18.5 कोटी, इंडोनेशियातील 14.6 कोटी, सुदान 10.3 कोटी, नायजर 10 कोटी, फिलीपिन्समध्ये 9 कोटी, बांगलादेश 9.80 कोटी, बुर्किना फासोमध्ये 6.40 कोटी आणि थायलंड 6.20 कोटी लोकांना उष्णतेच्या भयावह संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

राष्ट्रीय विज्ञान अकादमीद्वारे प्रकाशित अहवालानुसार, जगातील बहुतांश लोक अजूनही अशा ठिकाणी रहायला प्राधान्य देतात जेथे सरासरी किमान तापमान 6 ℃ आणि सरासरी कमाल तापमान 28 ℃ पर्यंत असते. पण हे तापमान वाढले अथवा कमी झाल्यास, तर त्याचे परिणाम मानवी शरीरावर होते. सध्या जगातील बर्‍याच देशांमध्ये जमीन समुद्रापेक्षा वेगाने तापत आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरी सरासरी जागतिक तापमान 3℃ ने वाढेल. तेव्हा मानवाला वेगवेगळ्या देशांच्या आणि तेथील हवामानानुसार सुमारे 7.5 ℃ जास्त तापमानास तोंड द्यावे लागेल.

रेल्वे निघाली घेऊन पाणी, चेन्नईत पाणीबाणी !

या सगळ्या तापमान वाढीचे परिणाम बघता येत्या काही वर्षांतच जगातील 30 टक्के लोकांना अत्यंत उच्च तापमानात रहावे लागणार आहे. तेव्हा ही परिस्थिती आता सहारासारख्या वाळवंटी प्रदेशासारखी होईल, जिथे सद्या 55 किंवा 56 ℃ तापमान असते. याचेच परिणाम म्हणून सन २०७० पर्यंत जगातील एक तृतीयांश लोकसंख्येला अतिशय उष्ण प्रदेशांत राहावे लागेल.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: