फर्ग्युसन महाविद्यालयात ‘महिला जागर रॅली’चे आयोजन
प्रतिनिधी
पुणे, ८ मार्च
‘मुलींचा सन्मान, देशाचा सन्मान’, ‘दहेज हटावो, समाज बचाओ’, ‘सेव्ह गर्ल, सेव्ह चाईल्ड अँड लाईफ’ अशा विविध घोषवाक्यांनी आज फर्ग्युसन महाविद्यालयाचे परिसर निनादून उठले. जागतिक महिला दिनानिमित्त आज सकाळी फर्ग्युसन महाविद्यालयात ‘महिला जागर रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयात आज सकाळी १० वाजता ‘महिला जागर रॅली’चे आयोजन करण्यात आले. या रॅलीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. ‘स्त्री भ्रूणहत्या थांबवा’, ‘महिलांचा सन्मान, देशाचा सन्मान’, ‘सेव्ह गर्ल चाईल्ड, सेव्ह लाईफ ऑन अर्थ’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘दहेज हटाओ, समाज बचाओ’ अशा विविध घोषणा देत महाविद्यालयातील मुले-मुली आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून महाविद्यालयाच्या संपूर्ण आवारात रॅली काढण्यात आली आणि रॅलीचे शेवट मुख्य इमारतीजवळ येऊन झाले.
रॅलीच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी, उपप्राचार्या प्रा. जोगळेकर, प्रा सविता केळकर, निर्मला तळपे, रुपाली शिंदे व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. “आपले महाविद्यालय नेहमी चर्चेत असणारे ठिकाण आहे. महाविद्यालयातील मुली फक्त अभ्यासातच हुशार किंवा चांगली कामगिरी करतात, असा आपला सर्वसाधारण समज असतो. मात्र तसे नाही, तर आपल्या महाविद्यालयातील मुली इतरही क्षेत्रात खूप मोठी कामगिरी करत असतात आणि त्यातून त्या खुपकाही शिकत असतात”, असे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी म्हणाले. आपल्या महाविद्यालयातून अनेक महिला प्रशासकीय अधिकारी घडलेल्या आहेत आणि महिला सशक्तीकरणासाठी महाविद्यालयाचा नेहमीच पुढाकार असतो, असे म्हणत त्यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्या जोगळेकर आणि प्रा. केळकर यांनीही यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.

आज सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयातील रुबिना मुल्ला, शर्मिला येवले, लक्ष्मी गायकवाड व सुनील जाधव या विद्यार्थ्यांनी रॅलीचे नियोजन केले. सोबतच, रॅलीमध्ये वेदांती बाबर, कृष्णा मुगळे, कृष्णाई उळेकर, अपूर्व कांबळे व इतर विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि मुख्यत्वाने, महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
◆◆◆