मुंबईकरांच्या सेवेत देशातील पहिली ‘फिरती चाचणी बस’!
‘कोव्हिड-१९’ च्या विषाणूची थेट लोकांपर्यंत जाऊन चाचणी करणारी देशातील पहिली ‘फिरती चाचणी बस’ मुंबईत दाखल झाली आहे. जाणून घ्या मुंबाईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या या ‘मोबाईल टेस्टिंग बस’ विषयी.
ब्रेनविशेष | मुंबई
कोरोना विषाणूची ‘स्वॅब व एक्स-रे’ चाचणी करणारी अत्याधुनिक व वातानुकूलित ‘फिरती चाचणी बस’ (मोबाईल टेस्टिंग बस) नुकतीच मुंबईत उपलब्ध करून देण्यात आली. मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली अशाप्रकारची ही देशातील पहिलीच बस आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही बस मुंबईतील विविध भागात जाऊन नागरिकांची कोरोना टेस्ट करणार आहे. त्यामुळे प्रथम ‘कोविड -19‘ चाचणी बस मुंबईला देण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बसचे लोकार्पण करण्यात आले. अशावेळी, या फिरत्या चाचणी बसची काय-काय वैशिष्ट्ये आहेत आणि ही कशी काम करते तर जाणून घेऊयात.
● ‘मोबाईल टेस्टिंग बस’ची वैशिष्ट्ये
– या बसमध्ये कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र खोलीसह ‘मोबाइल एक्स रे’ची स्वतंत्र व्यवस्था आहे.
– ‘कोरोना विषाणू‘ शोधण्यासाठी ऑक्सिजन ‘कॉम्बीनेशन संपृक्तता’ (Saturation) वापरेल आणि क्ष-किरण (X-rays) देखील वापरेल.
– तसेच, ही टेस्टिंग बस ‘आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन’ सुविधांसह सुसज्ज आहे.
– ‘क्लाऊड ट्रान्सफर्म’ तंत्रज्ञानाद्वारे रेडिओलॉजी विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ चाचणी करणार आहेत.
– याद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांना विविध माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून कमी वेळेत व प्रभावीपणे रुग्ण शोधण्यास मदत होणार आहे.
देशातील पहिल्या ‘फिरत्या पोटविकार उपचार केंद्रा’चे राज्यात उद्घाटन
● फिरत्या चाचणी बसचे फायदे
– या बसच्या मदतीने मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्रात कोरोना चाचणी करणे खूप सोपे जाईल.
– यासह, स्क्रीनिंग दरम्यान जास्त धोका असलेल्या संशयितांना अलग ठेवणे देखील सोपे होईल.
– तसेच, या फिरत्या बसच्या माध्यमातून थेट रुग्णांपर्यंत पोहचून तपासण्या करण्यात येणार आहेत.
क्रसना डायग्नोस्टिक्स प्रा. लि. पुणे व ‘आय.आय.टी. ऍल्युमिनाय कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थांच्या वतीने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) कोरोना चाचणीची अत्याधुनिक तांत्रिक बस तयार करण्यात आली आहे. दक्षिण विभागामार्फत वरळीच्या ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ येथे या मोबईल टेस्टिंग बसची व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र रूमसह मोबाइल एक्स-रे ची स्वतंत्र व्यवस्था असलेली ही अत्याधुनिक बस आता महापालिकेच्यावतीने उपलब्ध होणार आहेत. सध्या एक बस महापालिकेला प्राप्त झाली असून, या फिरत्या बसच्या माध्यमातून रुग्णांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.
काही नियम शिथिल, मात्र सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक
दरम्यान, मुंबई महानगरपालिका याप्रकारच्या बस तयार करणार असून, आरोग्य विभागाच्या संबंधित रूग्णालयांमध्ये कोरोना चाचण्यांसाठी यापुढे वापरण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.
◆◆◆