कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवरील अंत्यसंस्काराविषयी जागतिक स्थिती
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या मृत्युंच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. तर, जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मृत शरीराला स्पर्श करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला जाळलं किंवा दफनही केलं जाऊ शकतं, अशी माहिती ‘जागतिक आरोग्य संघटने’ने दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता अनेक देशांनी मृतदेह जाळण्यास सुरवात केली आहे. यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले म्हणजे, मृतदेह दफन करण्याच्या तुलनेत मृतदेह जाळल्याने विषाणू नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. तर दुसरे म्हणजे, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मृत्यूंमुळे काही देशांमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी जागेची कमतरता आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहातही संसर्गाचा धोका असल्याने प्रत्येक देशात या मृतदेहांवर वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
● वैश्विक परिस्थिती
दरम्यान, भारतासह इतर देशांत मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये मृतदेहाला दफन करण्याची प्रथा आहे. तर कोरोनग्रस्तांच्या मृत्यूची वाढती संख्या पाहता चीनमध्ये आणि श्रीलंकेतही मृतदेह जाळण्यात येत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लोक आपल्या धर्म आणि प्रथेनुसार मृतावर अंत्यसंस्कार करु शकतात. परंतु यात १० हून अधिक लोक सामिल होऊ शकत नाही. त्याशिवाय, मृतदेहाला कुटुंबियांनी स्पर्श करु नये, असंही सांगण्यात आलं आहे.
घरपोच औषधे पुरवण्यासाठी ‘जनौषधी केंद्र’ झालीत ऑनलाईन !
ब्रिटनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मृताच्या नातेवाईकांना अंतिम संस्कार करण्याची परवानगी आहे. तर, याहून भयावह परीस्थिती इटलीमध्ये असून, इटलीमधील नियम अधिक कठोर आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातील कपड्यांवरच दफन केलं जातय. तसेच, नातेवाईंकाना मृतदेह पाहण्याचीही परवानगी याठिकाणी दिली जात नाही. तर, इस्त्राईलमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्याचा चेहरा पाहण्याची परवानगी देण्यात आली असून, यावेळी त्यांना ‘पीपीई किट’ घालणं बंधनकारक केलं आहे.
भारतात प्रथेनुसार, मृतदेहाला अग्नी देण्याची किंवा दफन करण्याची परवानगी आहे. परंतु, मृतदेहावर कोणत्याही प्रथा करु शकत नाही. भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाबाधित मृतदेह ट्रेंड हेल्थकेयर वर्करच घेऊन जाऊ शकतात. हेल्थ केयर वर्कर आणि मृताच्या कुटुंबियांना पीपीई किट घालणे अनिवार्य आहे.
◆◆◆