‘ग्लेनमार्क फार्मा’ला ‘फॅव्हीपीरावीर’च्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘डिसीजीआय’ची परवानगी !

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी या विषाणूवर प्रभावी लस शोधण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु आहे. तर, भारतात आता जपाननिर्मित प्रतिविषाणू औषध ‘फॅव्हीपीरावीर‘ (Antiviral Drug Favipiravir) या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरु झाल्या आहेत. भारतातील औषध नियमन करणारे ‘भारताचे औषधे महानियंत्रक’ (Drugs Controller General of India) यांनी या चाचणीला परवानगी दिली आहे. जर चाचणी यशस्वी झाली, तर कोरोनावर उपचार करण्यासाठी औषध स्वस्तपणे उपलब्ध होईल, अशी माहिती ‘ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेड’ने आज दिली.

जपानमधील ‘फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन’ ‘एविगन‘ (Avigan) या ब्रॅण्डच्या नावाखाली ‘फॅव्हीपीरावीर’ (Favipiravir) गोळ्यांची (Tablets) निर्मिती करते. ‘फॅव्हीपीरावीर’ हे कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांपैकी एक आहे. ‘कोव्हिड-१९‘च्या रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यासाठी एप्रिल महिन्यात फॅव्हीपीरावीर औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी मिळाली होती. ३० एप्रिलला भारतात ‘ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेड’ला या औषधाच्या चाचणीची परवानगी मिळाली होती. त्यावेळी ग्लेनमार्क फार्माने ‘डीसीजीआय’कडून अशी मंजुरी मिळवणारी ती देशातील पहिली कंपनी असल्याचा दावाही केला होता. त्याच दिवशी ग्लेनमार्कचे शेअर्सही 9 टक्क्यांनी वधारले होते.

‘फॅव्हीपीरावीर’ हे एक अँटी-व्हायरल औषध आहे. या औषधाने इन्फ्लूएंझा विषाणूविरूद्ध योग्य प्रतिसाद दर्शविला होता. जपानमध्ये ताप, सर्दी असलेल्यांवर फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची २०१४ मध्ये परवानगी देण्यात आली.

हेही वाचा : ‘रेमडेसिवीर’ ठरले ‘कोव्हिड-१९’वरील एकमेव मान्यताप्राप्त औषध!

भारतात सध्या ‘कोव्हिड-१९’चे ७०,७५६ रुग्ण आहेत, तर २२९३ जणांचा मृत्यू झाला आहे.  ग्लेनमार्कच्या उपाध्यक्ष आणि क्लिनिकल डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. मोनिका टंडन याबाबत बोलताना म्हणाल्या, “भारतात फॅव्हीपीरावीर औषधाच्या चाचण्या सुरु झाल्या असून, दहा किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण असलेल्या सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये या चाचण्या घेण्यात येतील. या चाचण्यांचे  निष्कर्ष जुलै-ऑगस्टपर्यंत समोर येतील. तसेच, फॅव्हीपीरावीर औषधाचा रुग्णावर नेमका काय परिणाम होतो, याची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना उत्सुकता आहे. सध्या करोना व्हायरसवर प्रभावी औषध नाही. त्यामुळे या चाचण्यांचा निष्कर्ष महत्वपूर्ण असणार आहे.”

‘ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे इंडिया फॉर्म्युलेशन्स’चे सुजेश वासुदेवन म्हणतात की, ‘कोव्हिड-१९‘ च्या रूग्णांवर लवकरात लवकर उपचार आणणे व साथीवर नियंत्रण मिळविणे हा आमचा प्रयत्न आहे. जर औषधाच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या, तर आम्ही संपूर्ण भारतामध्ये या औषधाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलू.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: