शासनाची खरी दिवाळी; ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींचा जीएसटी!

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


केंद्र शासनाने जाहीर केलेल्या वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) आकडेवारीनुसार देशाच्या अप्रत्यक्ष कर संकलनाने पुन्हा एकदा विक्रमी आकडा गाठला आहे. ऑक्टोबर महिन्यात शासनाकडे तब्बल १.३० लाख कोटी रुपयांचा (म्हणजेच सुमारे १ लाख ३० हजार कोटी रुपये) जीएसटी जमा झाला आहे. सन २०१७ पासून हा जीएसटी संकलनाचा दुसरा सर्वाधिक मोठा आकडा आहे.

वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी झाली त्या सन २०१७ पासून देशात दुसऱ्यांदा प्रतिमाह सर्वाधिक जीएसटी ऑक्टोबर महिन्यात संकलित झाला आहे. ह्या महिन्यात तब्बल १.३० लाख कोटी रुपयांचे जमा झालेले हे अप्रत्यक्ष कर कोव्हिड-१९ नंतर आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे व सणासुदीच्या मागणीला दर्शवते. गेल्या ४ वर्षांतील सर्वाधिक रु. १.४१ लाख कोटींचा जीएसटी एप्रिल, २०२१ मध्ये संकलित झाला होता.

पेट्रोलियमच्या दर कपातीचा कोणताही प्रस्ताव नाही

ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी लक्षात घेता, गेल्या चार महिन्यांत ही सलग चौथी वेळ आहे, जेव्हा जीएसटी संकलन १ लाख कोटींपेक्षा अधिक झाले आहे. सप्टेंबर, २०२१ मध्ये एकूण १ लाख १७ हजार कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत या ऑक्टोबरमध्ये वस्तू व सेवांवरील अप्रत्यक्ष कर संकलन २४% नी वाढले आहे, तर २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३६% अधिक आहे. 

> विभागवार जीएसटी संकलन किती आहे?

ऑक्टोबर, २०२१ मध्ये एकूण १ लाख ३० हजार १२७ कोटी रुपयांचे स्थूल वस्तू व सेवा कर (ग्रॉस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) संकलित झाले. यापैकी २३ हजार ८६१ कोटी इतका केंद्रीय जीएसटी (CGST) आहे, तर राज्य जीएसटीचा (SGST) वाटा ३० हजार ४२१ कोटी रुपयांचा आहे. एकीकृत वस्तू व सेवा कराचे (IGST) प्रमाण ६७ हजार ३६१ कोटी रुपयांचे आहे व ८ हजार ४८४ कोटी रुपयांचा अधिभार स्थूल जीएसटीत समाविष्ट आहे.

केंद्रीय तसेच राज्य कर प्राधिकरणांनी कर अनुपालनसाठी घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे मागील महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन अधिक झाल्याचे शासनाचे म्हणणे आहे. सोबतच, वस्तू व सेवा कर परिषदेने (GST Council) वैयक्तिकरित्या कर चुकवेगिरी करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यासाठी योजलेल्या विविधांगी उपायोजना यांमुळे हे संकलन वाढले आहे. 

हेही वाचा भारतात गंभीर उपासमारी कायम; भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी!

भारतीय अप्रत्यक्ष कर क्षेत्रात वस्तू व सेवा कराची अंमलबाजवणी ही एक विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण कर सुधारणा मानली जाते. देशातील केंद्रीय तसेच राज्य पातळीवरील अनेक अप्रत्यक्ष करांना एकत्रित करून १ जुलै २०१७ पासून ‘वस्तू व सेवा कर’ (GST) हा एकाच मोठा अप्रत्यक्ष आकाराला जातो. दरम्यान, काही महत्त्वाच्या वस्तू व सेवा या कराच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत, म्हणजे त्यांच्यावर आधीसारखेच कर नियम व स्वरूप लागू आहेत.   

आमच्या टेलिग्राम वाहिनीत नक्की सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in  सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: