प्राप्तिकर विभागाचे पुण्यात छापे; ४०० कोटींचे बेहिशोबी उत्पन्न उघड!

ब्रेनवृत्त | मुंबई


प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) 25 नोव्हेंबर रोजी पुण्यातील दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित असलेल्या एका नामवंत समूहावर छापे घालून  शोध व जप्ती प्रक्रिया राबवली होती. या छाप्यांतर्गत विभागाद्वारे देशभरातील 6 शहरांमध्ये असलेल्या जवळपास 30 पेक्षा जास्त संकुलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. 

हेही वाचा 👉 बाबा रामदेवांची ‘पतंजली झाली करमुक्त’ !

प्राप्तिकर विभागाच्या या तपासादरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि कर चुकवल्याचे पुरावे सापडले असून, ते जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या प्राथमिक छाननीदरम्यान हे स्पष्ट दिसून आले की बनावट खरेदी, बेहिशोबी रोख रकमेद्वारे विक्री, रोख रकमेच्या कर्जाचे व्यवहार आणि त्यांचा चुकारा, स्पष्टीकरण देता न येणारे रोखीचे कर्जव्यवहार इत्यादी गैरप्रकाराचा अवलंब करून संबंधित व्यवसायिकांद्वारे करपात्र रक्कम लपवण्यात आली आहे.

सोबतच, या दुग्ध व्यवसायिकांद्वारे पशुधनाची विक्री किंवा मृत्यू दाखवून नुकसान झाल्याचे चुकीचे दावे करण्याच्या प्रकारांची देखील या तपासात दखल घेण्यात आली आहे. तसेच, संबंधित समूहाने आपल्या करपात्र उत्पन्नात विशिष्ट कपातीचा दावा करण्यासाठी योग्य प्रकारची आणि स्वतंत्र खातेवह्या ठेवल्या नसल्याचे उघड करणारे पुरावे देखील सापडले आहेत.

हेही वाचा | दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा; पेट्रोल व डिझेलची दरकपात!

या शोधमोहिमेत रोख रक्कम आणि व्यवहाराचा तपशील उपलब्ध नसलेले दागिने असे मिळून सुमारे 2.50 कोटी रुपयांची सामग्री जप्त करण्यात आली आहे.  तर काही बँक लॉकरची तपासणी अद्याप बाकी असल्याचे विभागाने सांगितले आहे. या शोधमोहिमेत आतापर्यंत 400 कोटी रुपयांहून जास्त बेहिशोबी उत्पन्नाची माहिती मिळाली असून, पुढील तपास सुरू असल्याचेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. 

(संदर्भ : पत्र सूचना कार्यालय)

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: