देशातील सहा नवीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन!
नवी दिल्ली, ३० जानेवारी
भारतीय रेल्वेद्वारे देशाभरात सहा नवे बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी या नव्या प्रस्तावाबाबत माहिती दिली आहे. मुंबई-अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प अजूनही रखडलेलाच असला, तरी नवीन सहा बुलेट ट्रेन मार्गांपैकी दोन मार्ग महाराष्ट्रात प्रस्तावित आहेत.
भारतीय रेल्वे बोर्डाने सहा नवीन बुलेट ट्रेन प्रकल्प देशभरात सुरू करण्याचे ठरवले आहे. या सहा मार्गांपैकी सर्वात मोठा मार्ग दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद असा असून, याची एकूण लांबी ८८६ किमी आहे. दिल्ली-ग्रेटर नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी या दुसऱ्या सर्वात मोठ्या लांब मार्गाची बुलेट धावणार आहे. दक्षिण भारतात चेन्नई-बंगळुरू-म्हैसूर या ४३५ किमी लांबीच्या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. या नवीन सहा मार्गांची आखणी सुरू झाली असून, एका वर्षाच्या आत याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डातर्फे देण्यात आली आहे.
सहा नवीन मार्गांपैकी दोन मार्ग महाराष्ट्र राज्यात प्रस्तावित आहेत. यापैकी एक महाराष्ट्रातच, तर दुसरा महाराष्ट्राबाहेर जाणारा आहे. एकीकडे, मुंबई-अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प आधीचाच रखडलेला असताना, रेल्वेने बोर्डाने हे दोन नवे मार्ग प्रस्तावित केले आहेत. महाराष्ट्रात मुंबई-नाशिक-नागपूर या ७५३ किमी लांबीच्या मार्गावर राज्यातच बुलेट ट्रेन धावेल, तर दुसरा मार्ग ७११ किमीचा मुंबई ते हैद्राबाद असा आहे.
● देशातील सहा नवे बुलेट ट्रेन मार्ग
१. दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (८८६ किमी)
२. दिल्ली-ग्रेटर नोएडा-आग्रा-लखनऊ-वाराणसी (८६५ किमी)
३. दिल्ली-चंदीगड-लिधियाना-जालंधर-अमृतसर (४५९ किमी)
४. मुंबई-नाशिक-नागपूर (७५३ किमी)
५. मुंबई – हैद्राबाद (७११ किमी)
६. चेन्नई-बंगळुरू-म्हैसूर (४३५ किमी)
◆◆◆