चिनी उत्पादनांवर बहिष्काराचा भारताचा प्रयत्न अपयशी ठरेल !
“चीनची उत्पादने सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणे कठिण आहे. त्यामुळे भारताचे चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल”, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
ब्रेनवृत्त | शांघाय
“चीनची उत्पादने सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणे कठिण आहे. त्यामुळे भारताचे चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल,” असे म्हणत ग्लोबल टाईम्सने पुन्हा एकदा भारतातवर निशाणा साधला आहे. पूर्व लडाखमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातवरण आहे. आधीच चीनमधून उगम झालेला कोरोना विषाणू आणि त्यात सीमाभागात सुरु असलेला तणाव यांमुळे भारतीयांनी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेवरून चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या लेखातून देशावर निशाणा साधला आहे.
“सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूनबूजून केला जात आहे. मात्र, चीनमध्ये तयार होणारी उत्पादने भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे चीनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल”, असे या लेखातून म्हटले आहे. तसेच, या लेखात सोनम वांगचूक यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सोनम वांगचूक यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची विनंती केली होती. त्यावर या लेखातून वांगचुक यांच्यावरही निशाणा साधला आहे. सोनम वांगचूक यांच्यासारख्या व्यक्ती सामान्य भारतीयांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे या लेखातून म्हटले आहे.
दुसरीकडे, भारत – चीन सीमेवरील तणाव गंभीर असून, याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहेत. मात्र, तरीही भारतातील काही प्रसारमाध्यमे आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे शांघाय इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटले आहे. मोदी सरकारने भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी ते आता भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) केवळ १६ टक्के आहे. त्यामुळे, भारतात चीनी उत्पादनांना प्रचंड मागणी असून ती भारतीय बाजारातून कधीही जाणार नाही, असेही झाओ जेनचेंग यांचे म्हणणे आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार, भारतामध्ये चीनमधील स्मार्टफोनच्या ब्रँडचा बाजारातील हिस्सा सुमारे 72 टक्क्यांपर्यंत आहे. तर २०१९ मध्ये भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार तब्बल ९३ अब्ज डॉलर्स इतका होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ग्लोबल टाईम्सने ट्वीटरच्या माध्यमातून भारताला इशारा दिला होता. “भारतात रणनीती तयार करण्याचे आणि धोरणं ठरवण्याचा अधिकार एका छोट्या समुहाकडे आहे. तो समूह चीनविरोधातील नकारात्मक विचारांनी भरलेला आहे. चीनची प्रगती, तसंच बीजिंग आणि नवी दिल्ली यांच्यातील वाढती दरी यामुळे चीनविषयीचा भारताचा संभ्रम वाढत आहे,” असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले होते.
दोन दिवसापूर्वी लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या मुद्यावरून नुकतीच दोन्ही देशांच्या सैन्यदलाची चर्चा झाली. यात भारताच्या बाजूने लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी प्रतिनिधित्त्व केले, तर चीनच्या झिनजियांग मिलिटरी रीजनचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांनी प्रतिनिधित्त्व केले.