चीनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सज्ज

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली 

कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या बाहेरही झाला असून, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत  200पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 हजारहून अधिकांना रोगाची लागण झाली आहे. भारतातही या विषाणूचा प्रभाव दिसू लागला असून, केरळमध्ये एक संशयित रुग्ण आढळला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले असून, केंद्र आणि राज्य सरकारही सज्ज झाले आहेत. कोराना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक शहरे बंद करण्यात आली आहेत, तर काही शहरांमधील लोक संक्रमण टाळण्यासाठी स्वत:च्या घरात कैद झाले आहेत. भारतात केरळमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे, तर दिल्लीमध्येही काही संशयास्पद रुग्ण सापडले आहेत. देशातील जवळपास 21 विमानतळांवर चीन आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांची औष्णिक तपासणी केली जात आहे. तसेच, भारतीय विमानतळांवर सुमारे 100 स्कॅनर बसविण्यात आले आहेत. सोबतच, चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची तयारीही सुरू केली आहे.

चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान आज वुहानमध्ये पोहचणार आहे. “चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना व तेथूूून निघण्यास राजी असलेल्या भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान शुक्रवारी वुहानमध्ये पोहचेल. तसेच, हुबेई प्रांतात अडकलेल्या उर्वरित भारतीयांना दुसर्‍या विमानातून बाहेर काढण्यात येईल” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या यादीमध्ये सुमारे 374 विद्यार्थी पहिल्या विमानातून भारतात परत येणार आहेत. तेथून बाहेर काढण्यापूर्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल. त्या विद्यार्थ्यांना परराष्ट्र मंत्रालयाने मास्क, ग्लोव्हज, टिशू पेपर आणि हँड सॅनिटायझर, अन्न व पाण्याच्या बाटल्या यासारख्या वस्तू आपल्यासोबत नेण्याचा सल्ला दिला आहे.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: