ऍमेझॉनच्या अधिकाऱ्यांवर गांजाच्या तस्करीचा आरोप; १ टन गांजाची ऑनलाईन विक्री!
वृत्तसंस्था । रॉयटर्स
ब्रेनवृत्त । भोपाळ
जगप्रसिद्ध ई-वाणिज्य कंपनी असलेल्या ऍमेझॉनच्या (Amazon.com) स्थानिक शाखेच्या वरिष्ठ अधिकार्यांवर ऑनलाइन किरकोळ विक्रेत्याद्वारे गांजाची (marijuana) तस्करी केल्याच्या प्रकरणात अंमली पदार्थ कायद्यांतर्गत पोलिसांद्वारे ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविषयी पोलिसांनी काल (शनिवारी) माध्यमांना सांगितले.
14 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश पोलिसांनी दोन पुरुषांना 20 किलो गांजासह अटक केली आहे. अटक केलेली ही व्यक्ती ऍमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळाचा (वेबसाईट) वापर करून एक नैसर्गिक गोड पदार्थ असलेल्या स्टीव्हियाच्या पानांच्या स्वरूपातील अंमली पदार्थाचे ऑर्डर करत होती आणि त्याची इतर राज्यांमध्ये तस्करी करत असल्याचे आढळले आहे.
वाचा । भारताच्या ट्विटर प्रमुखाला कर्नाटक न्यायालयाचा तूर्त दिलासा
राज्याच्या पोलिसांनी जाहीर केलेल्या एका संबंधित निवेदनात म्हटले आहे, की ऍमेझॉन इंडियाच्या (Amazon India) कार्यकारी संचालकांना पोलिसांच्या प्रश्नांना कंपनीने उत्तरांच्या स्वरूपात प्रदान केलेल्या कागदपत्रांमधील तफावत आणि तपासातून समोर आलेल्या तथ्यांच्या आधारावर नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत आरोपी ठरवण्यात आले आहे. परंतु, अशा किती अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याविषयी पोलिसांनी सांगितलेले नाही.
यापूर्वीही पोलिसांनी ऍमेझॉनच्या अधिकाऱ्यांना चौकशी व चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांचा अंदाज आहे, की सुमारे $148,000 किंमतीचा जवळपास 1,000 किलो गांजा ऍमेझॉनद्वारे विकला गेला होता.
हेही वाचा । चॉपर घोटाळ्यातील कंपनीवरील बंदी उठवली, अटींसह व्यवहारांना परवानगी!
दुसरीकडे, आपली भूमिका स्पष्ट करताना ऍमेझॉनने एका निवेदनात म्हटले आहे, की ते कायदेशीररित्या प्रतिबंधित उत्पादनांना सूचीबद्ध करणे आणि त्यांची विक्री करण्यास परवानगी देत नाही. अशा कोणत्याही उल्लंघनाच्या बाबतीत ते विक्रेत्यांवर कठोर कारवाई करते. सोबतच, ऍमेझॉनने गांजाच्या कथित तस्करीबद्दल सांगितले, “या प्रकरणाविषयी आम्हाला सूचित करण्यात आला असून, आम्ही सध्या त्याची चौकशी करत आहोत.”
शासनाने अलिकडच्या वर्षांत बेकायदेशीर द्रव्य आणि अंमली पदार्थाच्या वापर व प्रसारावर कारवाई करण्याचे प्रयत्न अधिक कठोर केले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक नावाजलेले भारतीय अभिनेते आणि टीव्हीवरील व्यक्तिमत्त्वांची अंमली पदार्थ अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in