मीरा भाईंदरमध्ये होणार जैव-विविधता उद्यान
मुंबई, ३० नोव्हेंबर
मीरा भाईंदर इथे महानगरपालिका, पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान (बायो डायव्हर्सिटी पार्क) उभारण्याचे काम प्रस्तावित असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज दिली. जैवविविधता उद्यान तयार करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
देशभरातील पर्यटकांच्या पसंतीला उतरेल असे बायो डायव्हर्सिटी पार्क मीरा भाईंदर महापालिका आणि पर्यटन विभाग, एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार असल्याचे आज जाहीर झाले आहे. यासंबंधी मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरण व प्रशासकीय मंजुरी त्वरित देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहे. हा जैवविविधता उद्यानाचा पर्यटन प्रकल्प १२० कोटी रुपयांचा असणार आहे.
जैवविविधतेच्या या प्रकल्पाला जिल्हा प्रशासनातर्फे ३१ हेक्टर जमीन देण्यास संमती मिळाली आहे. महापालिका व राज्य सरकारच्या निधीतून इथे थीम रिसॉर्ट, सी फेस हॉटेल, आर्टिफिशियल लेक, बटरफ्लाय पार्क, योग केंद्रासह अनेकविध मनोरंजन, पर्यटन प्रकल्प इथे उभारले जाणार आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले एस्सेल वर्ल्ड आदींमुळे हे बायो डायव्हर्सिटी पार्क देशभरातील पर्यटकांना एक नवे पर्यटन स्थळ म्हणून उपलब्ध होणार असल्याचे रावल यांनी सांगितले. या बैठकीच्यावेळी नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह जिल्हा प्रशासन, महापालिका आणि एमटीडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
( संदर्भ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय)
◆◆◆