किल्ले प्रतापगडावर पोहचण्यासाठी ‘रोपवे प्रकल्प’

वृत्तसंस्था

मुंबई, ३० जून 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्यावर पर्यटकांना सहजरीत्या पोहचता यावे म्हणून महाबळेश्वर येथील जावळीपासून ते प्रतापगड, असा रोपवे तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

छायाचित्र स्रोत : ट्विटर 

छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा प्रतीक असलेला प्रतापगड किल्ला आजही भक्कमरित्या साक्ष देत उभा आहे. या किल्ल्याला भेट द्यायला हजारोच्या संख्येने पर्यटक नियमितपणे येत असतात. प्रतापगडावर पर्यटकांना सहजरीत्या पोहचता यावे म्हणून पर्यटन धोरण २०१६ च्या अंतर्गत जावळी, महाबळेश्वर ते प्रतापगड असा रोपवे तयार केला जाणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर पर्यटकांना गडावर जाणे सोपे होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील जावळी या गावापासून प्रतापगडापर्यंत जाणारा हा रोपवे एकूण ५.६ किमी लांबीचा असेल. राज्यातील गडकोट किल्यांच्या संवर्धनासाठी शासन प्रयत्नरत असून, प्रस्थापित रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा रोपवे प्रकल्प असल्याचे रावल यांनी म्हटले आहे. सोबतच, या प्रकल्पामुळे पर्यटकांचा वेळ वाचेल आणि गडावर जाणे सोपे होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्ययटनात भर पडणार आहे व छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचेही पर्यटन मंत्री रावल यांनी सांगितले.

 

● रोपवे प्रकल्प का ? 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या इतिहासाचा किल्ले प्रतापगड महत्त्वाचा साक्षीदार आहे. इतिहास प्रेमी व पर्यटकांची किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, प्रतापगडावर जाण्यासाठी अरुंद घाटरस्त्याचा वापर करावा लागतो, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पावसाळ्याच्या दिवसांत तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे पर्यटकांना प्रतापगडापर्यंत जाणे सोयीचे व्हावे यासाठी रोपवे प्रकल्पाची संकल्पना समोर आली आहे.
◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: