देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा पहिला निर्णय!

भारताच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या विचारांच्या अनुषंगाने नव्या सरकारने पहिलाच निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने’च्या रकमेत वाढ करण्यास पंतप्रधानांनी मंजूरी दिली आहे.

पंतप्रधानांनी दिलेल्या मंजूरीनुसार:-

  1. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, मुलांसाठी 2000 रुपये प्रती महिना असलेली शिष्यवृत्ती आता 2500 रुपये, तर मुलींसाठी 2250 रुपये असलेली शिष्यवृत्ती 3000 रुपये करण्यात आली आहे.
  2. या शिष्यवृत्ती योजनेचा परिघ विस्तारण्यात आला असून, दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांमध्ये शहीद झालेल्या राज्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही आता या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. राज्य पोलीस अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी 500 जागांचा वार्षिक कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय गृहमंत्रालय नोडल मंत्रालय म्हणून काम बघेल.

पार्श्वभूमी :

1962 साली राष्ट्रीय संरक्षण निधी’ची स्थापना करण्यात आली आहे.

राष्ट्रीय संरक्षण विषयक खर्चांसाठी या निधीअंतर्गत देणग्या स्वीकारल्या जातात.

या अंतर्गत मिळणारा निधी लष्करी दले, निमलष्करी दले, रेल्वे संरक्षण दल आणि इतर लष्करी सेवांमधे कार्यरत असलेल्यांच्या कल्याणासाठी वापरला जातो. या निधीवर देखरेख ठेवणाऱ्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, तर संरक्षण, अर्थ आणि गृहमंत्री त्याचे सदस्य असतात.

युद्धात किंवा लष्करी कारवायांमधे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी या निधीतून पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या अंतर्गत मुलांना तांत्रिक संस्थांमधे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत देशभरातल्या लष्करी सेवामधल्या जवानांच्या साडेपाच हजार पाल्यांना, तर निमलष्करी दलातल्या जवानांच्या दोन हजार पाल्यांना आणि रेल्वे विभागातल्या 150 मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी मदत करायची असल्यास केंद्र सरकारच्या अधिकृत संकेत स्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

देशाच्या सुरक्षेत महत्वाचे योगदान देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविषयी पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोणत्याही ऋतुत तसेच सणावारांना पोलीस कर्मचारी दक्ष राहून सुरक्षा देतात त्यामुळेच देश सुरक्षित आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. एक राष्ट्र म्हणून या जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आपले कर्तव्य आहे, याच भावनेने शिष्यवृत्तीचा निधी वाढवला असल्याचे त्यांनी सांगितले.

◆◆◆

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: