नेपाळमध्ये ₹१०० च्यावरील भारतीय नोटांवर बंदी!
पीटीआय
काठमांडू, १५ डिसेंबर
१०० रुपयांच्या वरच्या रकमेच्या भारतीय नोटांवर नेपाळच्या शासनातर्फे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे नेपाळमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भारतीय भाविकांना, तसेच भारतात काम करणाऱ्या नेपाळी लोकांना त्यांच्या दैनिक व्यवहारात त्रास सहन करावा लागणार आहे.
नेपाळमध्ये भारतीय चलन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मात्र आता नेपाळ सरकारने भारतीय चलनांतील ₹१०० पेक्षा जास्त रकमेच्या नोटांवर बंदी घातली आहे. नेपाळी नागरिकांना शासनातर्फे असे सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी भारतीय चलनाच्या ₹२००, ₹५०० आणि ₹२०००च्या नोटा जवळ बाळगू नये. या नोटांना अजून अधिकृत मान्यता शासनाने दिली नसल्याने त्यांवर बंदी घालण्यात आली असल्याचे, नेपाळचे सूचना आणि प्रसारण मंत्री गोकुळ प्रसाद बास्कोट यांनी म्हटले आहे.
आंतराष्ट्रीय व्यापाराचे नेपाळ हा भारतीय मालाचा आणि व्यापाराचा सर्वात मोठा सहयोगी देश आहे. जुन्या पद्धतीच्या नोटाबंदी करून भारत सरकारने नवीन ₹२००, ₹५०० आणि ₹२००० च्या नोटा जारी केल्या आहेत. नेपाळच्या या निर्णयामुळे भारत आणि नेपाळसोबतच भूतानी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम पडणार आहे.
◆◆◆