लिपुलेख मार्गावर नेपाळच्या आक्षेपामागे चीनचा दबाव
ब्रेनवृत्त, १७ मे
भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर आता नेपाळने आक्षेप घेतला आहे. मात्र, नेपाळच्या या आक्षेपामागे कोणाचातरी हात असण्याची दाट शक्यता जास्त दिसतेय, अशी माहिती लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी दिली. ‘मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थे’त (Manohar Parrikar Institute for Defense Studies and Analysis) आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी नेपाळच्या या आक्षेपामागे चीन असल्याचे संकेत त्यांनी दिले.
मुकुंद नरवणे म्हणाले, भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या या मार्गावर आता नेपाळने आक्षेप घेतला आहे. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. मात्र, या आक्षेपावरून सध्या दोन्ही देशांत लिपूलेख पासपर्यंतच्या रस्त्याबाबत शाब्दीक युद्ध सुरु आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा ८० किलोमीटरचा मार्ग आठ मे रोजी सुरु झाला. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार असल्याचे मुकुंद नरवणे यांनी सांगितले.
(संग्रहित छायाचित्र)
दुसरीकडे, नेपाळचे राष्ट्राध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी याबाबत राजनैतिक पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळचे अविभाज्य अंग असून ते परत मिळवण्यासाठी नवीन नकाशा जारी करु व लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवू, असं म्हटलं असल्याच नरवणे यांनी सांगितले.
तसेच, नेपाळच्या राजदूताने काली नदीच्या पूर्वेकडचा भाग त्यांचा आहे असं म्हटलं आहे. खरंतर त्यामुळे वादाचा विषयच नाहीय. कारण, आपण नदीच्या पश्चिमेकडे रस्ता बांधला आहे. त्यामुळे ते कोणत्या कारणासाठी आंदोलन करत आहेत ते समजत नाहीय. मात्र यापूर्वी कधी यावरुन वाद झाले नाहीत” असे नरवणे म्हणाले.