४ ऑक्टोबरला होणार युपीएससीची पूर्वपरीक्षा !
यूपीएससीची नागरी सेेवा पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून, मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येतील. मुख्य परीक्षा 5 दिवस चालणार असून तिची सुरुवात 8 जानेवारीपासून होणार आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘संघ लोकसेवा आयोगा’च्या (युपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता युपीएससीच्या विविध परिक्षांसंबंधी नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आयोगाने शुक्रवारी (ता. ५) आयोजित केलेल्या बैठकीत या तारीख निश्चित केल्या व त्यानुसार, आयोगाने संबंधित परीक्षांचे सुधारित वेळापत्रकही जाहीर केले आहे.
आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार यूपीएससीची नागरी सेेवा पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून, मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येतील. मुख्य परीक्षा 5 दिवस चालणार असून तिची सुरुवात 8 जानेवारीपासून होणार आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
वाचा : सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; जुलैमध्ये होणार परीक्षा
दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशभरातील सर्व महत्त्वाचे कामकाज अचानक बंद झाले. परिणामी, संघ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांही रद्द करण्यात आल्या. आधी केंद्रीय लोकसेवा आयोगानेे जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा होणार होती, पण टाळेबंदीमुळे ही परीक्षा पुुढे ढकलण्यात आली.
त्यानंतर, परत देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. आज केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा होणार असून, ८ जानेवारी २०२१ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.