दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा; पेट्रोल व डिझेलची दरकपात!
ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
ऐन दिवाळीचा सण सुरु झाल्यानंतर संघ शासनाने पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर लागू असलेला अबकारी शुल्क (Excise Duty) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमतींमध्ये अनुक्रमे रु. ५ व रु. १० ची दर कपात होणार असून, यामुळे देशातील नागरिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर थोडासा का होईना, पण दिलासा मिळण्याची आशा आहे.
शासनाने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी शुल्कात उद्यापासून कपात करण्याचे ठरवले आहे, म्हणजे मध्यरात्रीपासून कमी झालेल्या दराने वाहन चालकांना पेट्रोल व डिझेल त्यांच्या वाहनांमध्ये भरता येईल. डिझेलच्या किमतींवरील कमी करण्यात आलेले अबकारी कर हे पेट्रोलवरील अबकारी शुल्काच्या दुप्पट आहे. त्यामुळे रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतीची कामे सुरु करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या कपातीचा फायदा होईल, असे शासनाने म्हटले आहे.
विविध राज्यांनी सणासुदीच्या मुहूर्तावर पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याची विनंती केली होती. दरम्यान, शासनाने या दोन्ही खनिज तेलांच्या किंमतींवरील आकारलेला अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या किंमतींची अंमलबजावणी उद्यापासून होईल.
शासनाची खरी दिवाळी; ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींचा जीएसटी!
“अलीकडच्या काळात वैश्विक पातळीवर खनिज/कच्च्या तेलांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी, देशातील पेट्रोल व डिझेलच्याही किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि यामुळे महागाईतही वाढली. इतर देशांमध्येही जवळपास सर्वच ऊर्जा प्रकारांचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यांनीही किंमती कच्च्या तेलांच्या किंमती वाढवल्या आहेत”, असे अर्थ मंत्रालय म्हणाले.
On eve of #Diwali, Government of India announces excise duty reduction on petrol and diesel. Excise duty on Petrol and Diesel to be reduced by Rs 5 and Rs 10 respectively from tomorrow pic.twitter.com/peYP1fA4gO
— ANI (@ANI) November 3, 2021
सोबतच, अर्थ मंत्रालयाने असेही म्हटले आहे, की देशात कोणत्याही प्रकारच्या इंधन व ऊर्जेची कमी भासू नये आणि पेट्रोल व डिझेलची पुरेशा प्रमाणात उपलब्धता व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यांनी मोदी शासनाच्या या निर्णयाला एक नाटक असल्याचे म्हटले आहे. ” पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे हे शासनाने एक प्रकारचे नाटक आहे. पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी व्हायला हवे होते. ५ रुपयांनी भाव कमी केल्याने जनतेला काहीही फायदा होणार नाही. शासन परत भाववाढ करेल”, असे लालू प्रसाद म्हणाले.
आमच्या टेलिग्राम वाहिनीत नक्की सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in