राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा

संसदीय कायदा किंवा न्यायालयीन निकालाविना जन-आंदोलनाने राम मंदिर उभारले गेले तर देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असे रामदेवबाबा म्हणाले.

 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर

राम मंदिर प्रकरणावर तोडगा काढण्यात सर्वोच्च न्यायालयाला उशीर होत असल्याने यावर संसदीय कायद्यानुसारच मंदिर बांधणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेवबाबा यांनी दिली आहे.

राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा व्हावा असे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही महिन्यांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरण देशात खूपच चर्चेत आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही यावर प्रतिक्रिया देण्यास देशातील विविध कार्यक्षेत्रातील लोक मागे नाहीत. काल योगगुरू रामदेवबाबा यांनीही राम मंदिरविषयी आपले मत व्यक्त केले. “राम मंदिर संबंधीच्या प्रकरणावर तोडगा काढण्यास सर्वोच्च न्यायालयाला उशीर होत आहे. यावर न्यायालयाकडून कोणताही मार्ग दिसत नाही. त्यासाठी आता एकच पर्याय उरला आहे, तो म्हणजे राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा व्हावा. तरच राम मंदिर उभारणे शक्य होईल”, असे रामदेवबाबांनी म्हटले आहे.

पुढे रामदेव बाबा असेही म्हणाले की, राम मंदिर बनवण्याची प्रक्रिया वैधानिक असून, त्याविषयी संसदेत कायदा व्हायला हवा. जर संसदेत कायदाही तयार होत नसेल आणि दुसरीकडे सर्वोच न्यायालयाने आदेशही दिला नसेल, मात्र तरीही जन-आंदोलनाने राम मंदिर उभारण्यात आले तर देशात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी संसदेने कायदा करणे गरजेचे आहे.’

मात्र, रामदेवबाबा ‘जन-आंदोलन’ याविषयावर जास्त बोललेले दिसत नाही. रामदेव बाबा यांच्याप्रमाणेच याआधीही अनेक भाजपा नेत्यांनीही संबंधित प्रकरणावर भाष्य केले आहे.राम मंदिर उभारणीसाठी संसदेत कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनीही केली आहे. 
◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: