“त्या हत्तीणीच्या मृत्यूने नदीही रडू लागली”
ब्रेनवृत्त, मलप्पूरम
केळरच्या मलप्पूरम जिल्ह्यातील स्थानिकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले फळ खायल्या दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केरळमधील निलांबुरच्या एका वन अधिकाऱ्याने या विषयीची बाब फेसबुकवर टाकल्यामुळे संबंधित घटना प्रकाशात आली. या हत्तीणीला अशाप्रकारे मारण्याच्या या अमानवी कृत्याचा सगळीकडे निषेध होत असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यात एक हत्तीण खाण्याच्या शोधात असताना परिसरातील काही बेजबाबदार व असंवेदनशील लोकांनी तिला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले. या अननसाचा पोटात स्फोट झाल्याने हत्तीणीला गंभीर इजा झाली, तसेच तोंड आणि जिभेला गंभीर जखमी झाली. यामुळे त्या हत्तीणीचा मृत्यू झाला. ही अमानवीय घटना एक आठवड्यापूर्वीच (२७ मे रोजी) घडली आहे. केरळमधील निलांबुर येथील ‘सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्याना’तील वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी याविषयीची माहिती फेसबुकवर पोस्ट केल्याने, ही बाब समोर आली आहे.
संबंधित लोकांनी तिला ते फळ दिल्यानंतर, त्या हत्तीणीने ते फळ मोठ्या विश्वासाने खाल्लेही. तसेच, स्फोट झाल्यानंतर कुणालाही इजा न पोहचवता ती निघूनही गेली. शेवटी, जवळच्या वेल्लीयार नदीत जाऊन ती उभी राहिली आणि तिथेच तिचा मृत्य झाला.
“हे फळ खाल्ल्यानंतर तिच्या पोटात स्फोट झाला आणि त्यामुळे त्या हत्तीणीच्या जीभ आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळू लागली, मात्र वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हते. अशाही परिस्थितीत तिने एकाही व्यक्तीला इजा पोहचवली नाही. मला ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली” असे मोहन कृष्णन यांनी हा घटनाक्रम आपल्या फेसबूक खात्यावरून मांडला आहे.
तिच्या शवविच्छेदनानंतर वन अधिकाऱ्यांना कळून आले की, ती गरोदर होती आणि येत्या १८ ते २० महिन्यांत आपल्या बाळाला जन्म देणार होती. “ज्या डॉक्टरांनी तिचे शवविच्छेदन केले त्यांनी डोळ्यांतून अश्रू गाळताना म्हटले की, मृत्युमुखी पडलेली ही हत्तीण एकटी नाही. जरी मास्कमुळे त्याचे हावभाव लपण्यास मदत झाली असली, तरी मला त्यांचे दुःख समजले”, असे कृष्णन यांनी म्हटले आहे.
● हत्तीणीचा मृत्यूमुळे नदीही रडत होती
बचावकार्य पथकाचे भाग असलेले कृष्णन त्या हत्तीणीच्या जाण्याने निसर्गाला व इतर हत्तींना झालेले दुःख मांडताना लिहितात, “आम्ही सर्व चकित होतो. जवळपासच्या हत्तींना नेमके काय घडले आहे हे कळले होते आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. माझ्यामते नदीही हत्तीणीच्या जाण्याने रडू लागली होती. नदीचे ते रडणे माणसाच्या स्वार्थीपणाचा निषेध करत होते.”
या वन-अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे हे अमानवीय कृत्य समोर आले आहे. यामुळे प्रसारमाध्यमांमधून सगळीकडे एकच हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, संबंधित घटनेत दोषी असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
◆◆◆