७९व्या वर्धापनदिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कारमूर्तींचा गौरव
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ७९व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. हे पुरस्कार ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
मराठीब्रेन वृत्त
पुणे, १७ डिसेंबर
‘विद्रोहाची भाषा सोपी असते, पण ती कशासाठी आणि कोणत्या स्वरूपाची आहे, हे आधी आपल्याला माहीत असायला हवे. यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते’, असे मत जेष्ठ कवयित्री व ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ७९व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ७९व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील पत्रकार भवनात गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्रमिक पत्रकार संघ व तसेच पुणे विद्यापीठाद्वारे संचालित पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात २०१७-१८ सत्रात यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचे सत्कार या कार्यक्रमात डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच श्रमिक पत्रकार संघातर्फे गेल्या वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचेही सत्कार यावेळी करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की, योग्य ज्ञानप्रसार ही सद्या थांबलेली गोष्ट आहे. तेव्हा माहितीच्या विराट साठ्यात माध्यमांची भूमिका योग्य ज्ञानप्रसार करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या माहिती व तंत्रांज्ञानाच्या युगात पत्रकारिता हे समाजाला खूपकाही देऊ शकणारं माध्यम आहे. ‘जगात जेव्हा अनेक गोष्टी लोकांना एकमेकांपासून दूर नेण्याचे काम करतात, तेव्हा माध्यमांची भूमिका त्याहून वेगळी असायला हवी. विद्रोहाची भाषा सोपी आहे, मात्र ते कशासाठी आहे, कशा स्वरूपाचे आहे ? हे आधी आपल्याला माहीत असायला हवं. या सगळ्यांमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे’, असेही त्या म्हणाल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विभागाच्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या सागर बिसेन यांना २०१७-१८ या वर्षासाठीच्या एकूण पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यांमध्ये कै. रा. बा. कुलकर्णी स्मृती पारितोषिक, श्रीमती अरुणा पंढरपुरे पुरस्कार व उत्कृष्ट वृत्तनिर्मिती व व्यवस्थापनासाठीचा अनंतराव साठे पुरस्कारांचाही समावेश आहे. जनसंज्ञापन व पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम पुरस्काराने रिया सोहनी यांना गौरविण्यात आले. याच अभ्यासक्रमातील चैताली गायकवाड, अंगद तौर, सागर मांडे व इतरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यासोबतच श्रमिक पत्रकार संघाद्वारे आयोजित जोग निबंधलेखन स्पर्धेसाठी भालचंद्र देशमुख, पद्मसिंग भापकर, सत्यजित खांडगे यांसोबत गोपाळ देवकत्ते, अभिषेक राऊत, घनश्याम येणगे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याद्वारे रानडे इन्स्टिट्यूट इथे संयुक्तरित्या पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालविला जातो.
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील गुणवंतांसोबतच पत्रकार संघातर्फे आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांनाही पारितोषिक प्रदान करण्यात आले. १५ ते १७ डिसेंबर २०१८ या कालावधीत पुण्यातील विविध घडामोडींवर आधारित छायाचित्र प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले होते. उत्कृष्ट छायाचित्रणासाठी संदीप घोडके, गजेंद्र कळसकर आणि राहुल राऊत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. छायाचित्रण पत्रकारिता अभ्यासक्रमातील विद्यार्थी स्पर्धकांमधून वरूण कुमार(प्रथम क्रमांक), रोहन जावळे(द्वितीय), कृतार्थ देव (तृतीय) यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
याव्यतिरिक्त वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट, कॅरम व इतर स्पर्धांच्या विजेत्यांचेही सत्कार यावेळी करण्यात आले.
◆◆◆