‘एमसीए’चा कालावधी दोन वर्षांचा करण्यास पुणे विद्यापीठाची मंजुरी

ब्रेनवृत्त, पुणे

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे वाढते महत्त्व लक्षात घेता ‘मास्टर इन कॉम्पुटर अप्लिकेशन’ (एमसीए) या तीन वर्षाच्या पदव्युत्तर पदवीचा कालावधी आता दोन वर्षांचा करण्यास ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा‘ने मंजूरी दिली आहे. या नियमात बदल केल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे एक वर्ष कमी झाले असून, विद्यार्थ्यांना नवीन ट्रेंड शिकता येतील. तसेच, लॅटरल एंट्री बंद झाल्याने संस्थांचा खर्चही कमी होणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या कॉम्पुटर मॅनेजमेंट अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. अमोल गोजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाचा कालवधी हा दोन वर्षांचा असतो. पण ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’च्या (एआयसीटीई) नियमावलीनुसार ‘एमसीए’ पदव्युत्तर पदवीचा कालावधी तीन वर्षांसाठी होता. तर, बीएससी काॅमप्युटर किंवा बॅचलर इन बिझनेस ऍडमिनीस्ट्रेशन (बीबीए) पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एमसीए’च्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश (लॅटरल एंट्री) दिला जायचा.

इंटरनेट नसणाऱ्यांसाठी ‘एक वर्ग, एक वाहिनी’द्वारे भरणार शाळा

दरम्यान, सुरवातीच्या काळात विद्यार्थी प्रथम वर्षाला बॅचलर इन कॉमर्स (बी. कॉम) किंवा इतर पदवीला प्रवेश घ्यायचे. अशात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ‘एआयसीटीई’ने ‘एमसीए’च्या नियमात बदल करावे, अशी मागणी अखिल भारतीय पातळीवर होत होती. तर दुसरीकडे, राज्यभरात पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ‘एमसीए’चे शिक्षण देणाऱ्या २८ संस्थामधून सुमारे ३ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या अनुषंगाने ‘एआयसीटीई’च्या आदेशानुसार ‘एमसीए’ची पदवी दोन वर्षाची करण्याचा प्रस्ताव विद्या परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यानुसार, जानेवरी २०२० मध्ये ‘एआयसीटीई’ने ‘एमसीए’ला दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली. त्यामुळे यंदाच्या वर्षी पासून या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण वाढेल.

वाचा : राज्य शिक्षण मंडळाचे शैक्षणिक नियोजन तयार

‘एमसीए’च्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला परवानगी मिळाल्यानंतर आता ‘एमसीए’चा ५० टक्के अभ्यासक्रम लेखी (थेअरी), तर ५० टक्के प्रात्यक्षिक (प्रॅक्टीकल) असा असेल. त्याचबरोबर, २५ टक्के भाग ऑनलाईन शिक्षणाचा असेल. सोबतच, उद्योगांमधील सद्याचा नवीन ट्रेंड बघता विद्यार्थ्यांनाही त्यादृष्टीने तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, जावा, ओरॅकल हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमही उपलब्ध असणार आहेत.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: