नागपूर विद्यापीठाची पदवी प्रवेशप्रक्रिया सुरू
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवीच्या प्रवेशप्रक्रियेचा श्रीगणेशा केला आहे. यासाठी येत्या २८ जुलैपासून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना विविध शाखांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
ब्रेनवृत्त | नागपूर
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानंतर राज्यात पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होऊ लागल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवीच्या प्रवेशप्रक्रियेचा श्रीगणेशा केला आहे. यासाठी येत्या २८ जुलैपासून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना विविध शाखांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
बारावीच्या निकाल लागला की विद्यार्थ्यांची पदवीच्या प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांमध्ये गर्दी उसळते व सर्वकाही अनियंत्रित व्यवहार घडत असतात. या बाबींवर प्रतिबंध आणण्यासाठी नागपूर विद्यापीठाद्वारे मागच्या वर्षीपासून प्रवेशप्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जात आहे. परिणामी, यंदाही विद्यापीठाने प्रवेशप्रक्रिया कार्यक्रम आखून दिला आहे, त्यानुसार प्रवेशप्रक्रिया राबवून महाविद्यालयांना गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागेल. यासाठी यंदा सर्वच प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत.
दरम्यान, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा महाविद्यालयात नोंदणी करण्यापूर्वी विद्यापीठाच्या प्रवेश पोर्टलवर नोंदणी करून सर्व कागदपत्रे अपलोड करावयाचे बंधनकारक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना 28 जुलैपर्यंत नोंदणी पावती व प्रवेश अर्ज जमा करायचा आहे. 31 जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे व त्यांनंतर 4 ते 8 ऑगस्टदरम्यान गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित करायचे आहेत.
युजीसीच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक : मनुष्यबळ मंत्रालय
● प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
विद्यापीठ संकेतस्थळावर नोंदणी – 17 ते 28 जुलै
अर्जांची विक्री व स्वीकार – 17 ते 28 जुलै
गुणवत्ता यादी – जुलै 31 (दुपारी 2 वाजेनंतर)
प्रवेश निश्चिती – 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट
प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश – 10 ते 12 ऑगस्ट
सोबतच, रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील प्रवेश 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत होतील. तसेच, गरज पडल्यास 12 ऑगस्टनंतर समुपदेशन व स्पॉट ऍडमिशन करता येणार आहेत. विद्यापीठाने सदर वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत.
● शाखानिहाय उपलब्ध जागा
कला – 40,000
वाणिज्य – 30,000
विज्ञान – 35,000
विधि – 1,500
गृहविज्ञान – 400
गृहअर्थशास्त्र – 500
◆◆◆