सारं काही अबोलच !
डोळ्यापर्यंत आलेले आणि विस्कळीत झालेले तिचे काळे गर्द केस मनात रेंगाळत असलेल्या विचारांना विस्कळीत करतात. मग वाटतं की ह्या सगळ्यांना आपल्या कवितेच्या दुनियेत बंदिस्त करावं.
रविवार, २० जानेवारी
एकांतात कधी कविता करायला बसलो की, बेधुंद करणारा एक चेहरा डोळ्यासमोर येतो आणि मग लेखणीही अचानक स्तब्ध होते. ज्याप्रमाणे रानमाळावर एखादा वेडा प्रियकर रानपाखराच्या मागे बेभान होऊन फिरत असतो, अगदी तसेच विचार डोक्यात गरगर फिरत असतात. पण लेखणीला मात्र पाझर फुटत नाही. शेवटी पाझर फुटावं तरी कसं? अचानक डोळ्यांसमोर आलेला चेहरा पाहताच एवढा धुंद होऊन जातो, की भानही राहात नाही नेमकं काय करत बसलोय त्याचं.
तुझे ते हसरे नयन मला गालातल्या गालात हसू येण्यास भाग पडतात. तुझ्या नयनांच्या पापण्या उघडझाप होत असताना जणू हृदयाच्या ठोक्याशी संबंध असावा की काय, असा भास होतो. तुझ्या नजरेस नजर भिडली, की तुझ्या त्या कातील नजरेने मनाचे तुकडे झाल्यासारखं वाटतं. गुलाबाच्या पाकळ्यांसारखी ओठांवर लावलेली लाली मुखचंद्रावर सौंदर्य वाढवून जाते. ह्या सर्वांचं हवं तेवढं वर्णनच करता येत नाही.
प्रातिनिधिक छायाचित्र : स्रोत
डोळ्यापर्यंत आलेले आणि विस्कळीत झालेले तिचे काळे गर्द केस मनात रेंगाळत असलेल्या विचारांना विस्कळीत करतात. मग वाटतं की ह्या सगळ्यांना आपल्या कवितेच्या दुनियेत बंदिस्त करावं, आपल्या हृदयाच्या कोऱ्या कागदावर उतरवावं, पण यासाठी लेखणीला बहरच येत नाही.
शेवटी, बसतो मी विचारात गुंतून तुझ्या पायांच्या बोटांपासून तर डोक्याच्या केसापर्यंत…सारं सारं काही अबोल आहे असं समजत. पण तरीही माझ्या या जडमनाने प्रयत्न तरी केला आहे, तुझ्या या अबोल दिसणाऱ्या सौंदर्यावर थोडंतरी लिहिण्याचा…
“सखी सौंदर्याचे गंध तुझे,
वेड मजला लावून जाते.
चांदण्या रात्री आठवणींत,
भेटीचे स्वप्न देऊन जाते…”
लेख : देवेंद्र रहांगडाले
कमरगाव, ता. गोरेगाव
जि. गोंदिया, महाराष्ट्र
भ्र. क्र. ७०३०५४३०९६
ईमेल: devendrarahangdale67@gmail.com
◆◆◆
(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, इथे प्रकाशित होणाऱ्या लेखांशी व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.